नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, या योजनेच्या पुढच्या टप्प्याचे पैसे जमा करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशीही संवाद साधला. या कार्यक्रमाअंतर्गत, 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात, 19,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट जमा करण्यात आला आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हा नववा हप्ता होता.
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब तर आहेच, त्याशिवाय देशालाही नवे संकल्प करण्याचीही एक संधी आहे. येत्या 25 वर्षातला भारत बघण्यासाठी, आपण या संधीचे सोने करायल हवे अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. यासोबतच, स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजेच 2047 सालचा भारत कसा असेल, त्याची परिस्थिती कशी असेल हे निश्चित करण्यात आपले कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे, असं देखील ते म्हणाले.
‘हाच काळ, देशाच्या कृषी क्षेत्रासमोरच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी एक निश्चित दिशा देणारा आणि नव्या संधीचा लाभ घेण्यासाठीचा योग्य काळ आहे. बदलत्या परिस्थितीनुसार, भारताच्या कृषी व्यवस्थेत आता परिवर्तनाची गरज आहे,’ असं म्हणत त्यांनी कोरोना महामारीच्या काळात, शेतकऱ्यांनी घेतलेल्या विक्रमी पिकांबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले. तसेच कठीण काळात शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
कोरोना काळातही शेतकऱ्यांना बियाणे, खते यांचा पुरवठा सुरळीत राहील आणि बाजारपेठ उपलब्ध असेल याची सरकारने काळजी घेतली. पूर्ण काळ युरियाची उपलब्धता सुनिश्चित केली आणि ज्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली, त्यावेळी, सरकारने लगेचच शेतकऱ्यांना खत अनुदानापोटी 12000 कोटी रुपयांची व्यवस्था करत वाढलेल्या किमतींचा भार शेतकऱ्यांवर पडणार नाही, याची काळजी घेतली, असं देखील मोदी यांनी नमूद केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- नामांतर शहीद स्मारकाचे काम गतीने करा, आंबेडकरी विद्यार्थी संघटनांची कुलगुरूंकडे मागणी!
- ‘खायचं कोणाचं आणि गायचं कोणाचं? हे वागणं कौतुकास्पद पण…’; चित्रा वाघ यांचा खोचक टोला
- मराठा आरक्षणासाठी पहिलं ‘हे’ करणं गरजेचं; संभाजीराजेंचा राज्य सरकारला सल्ला
- भारतीय संघाला पहिल्या टेस्टपासून मिळेल ‘हा’ फायदा : दिनेश कार्तिक
- पंतप्रधानांच्या हस्ते पीएम-किसान योजनेचा नववा हप्ता जाहीर; 9.75 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ


