🕒 1 min read
कीव : रशियन सैन्याने युक्रेनमध्ये भयंकर विध्वंस केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना कीवमधून बाहेर पडण्यास सांगितले. पण झेलेन्स्की यांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला आहे. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टमध्ये एका वरिष्ठ यूएस गुप्तचर अधिकार्याचा हवाला देऊन असे म्हटले आहे की, झेलेन्स्कीने कीवमधून बाहेर पडण्याची ऑफर नाकारली. “मला दारूगोळा हवा, पळून जाण्यासाठी सल्ला नाही”, असे वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशिया-युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत रशियाविरोधात ठराव मांडण्यात आला. यावर सर्व देशांना मतदान करावे लागले. मात्र, भारताने या मतदानातून स्वतःला वगळले. सर्व सदस्य देशांनी मतभेद आणि वाद मिटवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करावेत, असे भारताने म्हटले आहे.
शुक्रवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या ठरावाच्या बाजूने ११ मते पडली. चीन, भारत आणि संयुक्त अरब अमिरातीने मतदानापासून दूर राहिले. हा ठराव सुरक्षा परिषदेत संमत होऊ शकला नाही कारण परिषदेचा स्थायी सदस्य असलेल्या रशियाने त्यावर वीटो केला होता.
जाणून घ्या वीटो पॉवर काय आहे?
वीटो हा लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ मी ‘परवानगी देत नाही’, असा होतो. प्राचीन रोममध्ये काही निवडून आलेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार होते. रोम सरकारची कोणतीही कृती थांबवण्यासाठी ते या अधिकारांचा वापर करू शकत होते. तेव्हापासून हा शब्द शक्तीसाठी वापरला जाऊ लागला. सध्या सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका यांच्याकडे वीटोचा अधिकार आहे. जर एखाद्या सदस्याला स्थायी सदस्यांचा निर्णय मान्य नसेल, तर तो वीटो पॉवर वापरून तो निर्णय रोखू शकतो. युक्रेनच्या बाबतीतही असेच घडले. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने युक्रेनच्या बाजूने मतदान केले, तर रशियाने वीटो पॉवर वापरून संपूर्ण प्रस्ताव रोखला.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
