औरंगाबाद : तब्बल ४८ रेमडेसिवीर इंजेक्शन गायब झालेले असतांनाही महापालिका प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. कर्मचार्यांवरील कारवाईचा निर्णय शुक्रवारी (दि. ३०) होण्याची शक्यता अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी वर्तवली आहे. दोषींवर निश्चित कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेने नोटिसा बजावून २४ तासांत खुलासा करण्याचे बजावल्याने भांडार विभागाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, मुख्य फार्मासिस्ट बी.डी. रगडे, साहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे, दीपाली साने व अनंत देवगिरीकर यांनी बुधवारच्या नोटिसचे गुरुवारी सायंकाळी उशिरा उत्तर दिले. यात जो प्रकार झाला त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी सर्वांनी केली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या स्टोअर रुममधून मेल्ट्रॉनच्या कोविड केअर सेंटरच्या स्टोअर रुमसाठी रेमडेसिवीरचे २६ बॉक्स देण्यात आले होते. त्यापैकी एका बॉक्समध्ये रेमडेसिवीर नसून एमपीएस इंजेक्शन असल्याचे मेल्ट्रॉनमधील स्टोअर रुमच्या कर्मचार्यांच्या लक्षात आले. २४ एप्रिल रोजी हा बॉक्स कर्मचार्यांनी उघडला, असे सांगितले जाते. २० एप्रिलला हे बॉक्स ताब्यात घेताना मेल्ट्रॉनच्या कर्मचार्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी देखील केली आहे.
२० एप्रिल रोजी जेव्हा रेमडेसिवीरचे बॉक्स आरोग्य विभागाच्या भवानीनगर येथील स्टोअर रुममधून मेल्ट्रॉन कोविड सेंटरच्या स्टोअर रुमसाठी पाठवण्यात आले, तेव्हा तेथील स्टोअर रुमच्या प्रमुखांनी बॉक्समध्ये खरोखरच ते इंजेक्शन आहेत का? हे तपासून घेणे गरजेचे होते. बॉक्स ताब्यात घेतल्यानंतर चौथ्या दिवशी त्यातील एक बॉक्स उघडला गेला आणि त्यात इंजेक्शन बदलण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे २० ते २४ एप्रिल या चार दिवसात इंजेक्शन कोणी बदलले, या प्रश्नावरच चौकशीचा प्रयास केला जात आहे.
मेल्ट्रॉनमधील स्टोअर रुमच्या कर्मचार्यांनी २० एप्रिल रोजी इंजेक्शनची पडताळणी करुन बॉक्स ताब्यात घेतले असतील, तर बॉक्समधील इंजेक्शन बदलल्याचे २४ एप्रिल रोजी कसे लक्षात आले, असा प्रश्न आहे. इंजेक्शन बदलाच्या प्रकरणात आरोग्य विभागाच्या भवानीनगरमधील कर्मचार्यांप्रमाणेच मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमधील स्टोअर रुमच्या कर्मचार्यांबद्दलही संयश व्यक्त होत असल्याचे बोलले जाते. प्रशासन त्यादृष्टीने तपास करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हळहळ! कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू, पती गंभीर
- हिंगोली जिल्हा रुग्णालयाला ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर्ससाठी एक कोटी रुपयांचा निधी
- कमी स्कोअर असलेल्या रुग्णांना रेमेडेसिवीर नाही; लातूरमधील रुग्णांचे नातेवाईक सापडतायत कोंडीत
- दवाखान्यातून सुटताच शरद पवारांचे पत्र अन् राष्ट्रवादीने उघडली तिजोरी !
- लसींच्या साठ्याबाबत आरोग्यमंत्र्यांची भूमिका बरोबरच आहे – देवेंद्र फडणवीस

