पुणे : सुमारे दोन आठवड्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना खुलं आव्हान दिलं होतं.
जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा पण त्यांनी केला होता. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. ‘राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे’ असं देखील सत्तार म्हणाले होते.
आता सत्तार यांच्या या पणावर जोरदार प्रत्युत्तर देऊन दानवेंनी खिल्लीच उडवली आहे. ‘अब्दुल सत्तार यांचं पहिलं वक्तव्य रावसाहेब दानवेंना पाडल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही असं होतं. तरीही दानवे निवडून आले. त्यानंतर आता त्यांनी ‘पण’ केला की दानवेंना पाडल्याशिवाय टोपी घालणार नाही.’ असं म्हणत दानवेंनी जुन्या संकल्पाची देखील आठवण करून दिली.
पुढे ते म्हणाले, ‘अब्दुल सत्तार माझे चांगले मित्र आहेत. बिचारे ते इतकं बोलतात, पण निवडणूक आली की माझंच काम करतात. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे. पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही. चिंता करू नका. खरं तर केसच उगवू देणार नव्हतो. पण आता त्यांनी टोपी घातली’ असा टोला रावसाहेब दानवे यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेतून लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात; वाय दर्जा ऐवजी मिळणार ‘ही’ सुरक्षा
- मुंबई महापालिकेच्या नोटिशीप्रकरणी सोनू सूदची उच्च न्यायालयात धाव !
- भंडारा : राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अल्प असून त्यात वाढ करावी – रामदास आठवले
- हॉटेल ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, फोर्स पाठवा…
- पालकांनो सावधान! ‘या’ ठिकाणचा आपत्कालीन मार्ग बंद आहे


