बीड : बीडमध्ये आज शनिवारी मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यांवर मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने याला पाठिंबा दिला आहे. हा मोर्चा कोरोनाच्या संकटामुळे उद्या न काढता पुढे ढकलावा, अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तर यावर आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला धुडकावून लावले आहे. ‘मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा तर निघणारच आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांना आडवून ठेऊ नये. अन्यथा ज्या ठिकाणी पोलीस मराठा समाज बांधवांना अडवतील त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करू’ असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिलाय.
तर आज बीड शहरातून मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी आ.मेटे यांनी नारायणगडावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी मोर्चाविषयी बोलताना ते म्हणाले की, ‘पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने काम करावे, आम्ही आमचे आमच्या पद्धतीने करूत. तसेच पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे असे आवाहनही मेटे यांनी केलेय.
आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भूमिका घेत आहोत. परंतु, मोर्चेकऱ्यांची प्रशासनाने अडवणूक करू नये. कोरोनामुळे मोर्चेकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कुणीही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये, कुणी जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवं येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आमदार मेटे यांनी दिला.
दरम्यान, मोर्चा हा बसस्थानकाच्या जवळून जाणार आहे. सध्या, बस वाहतूक बंद असल्याने सर्व बसेस आगारातच उभ्या होत्या. मात्र, मोठ्या संख्येने मोर्चा निघण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने बसेस विभागीय कार्यालयात हलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?
- राज्य सरकारकडून अधिकृत नियमावली जाहीर, सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू
- ‘पुजारा किंवा पंत असलेला संघ यशस्वी होऊ शकत नाही’
- पंजाबमध्ये अमरिंदर सिंह विरुद्ध सिद्धू वाद चिघळला; निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये घमासान
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या भोसले समितीत मराठाद्वेषी सदस्य’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

