नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोलचे नवीन दर जारी केले आहेत. गुरुवारी इंधनाचे दर वाढवल्यानंतर शुक्रवारी दरवाढ झाली नाही. मात्र आज पुन्हा इंधनाचे दर वाढले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल ३० पैसे प्रतिलिटरने महागले तर मुंबईमधील पेट्रोलच्या दरात २९ पैशांनी वाढ झालीय. दिल्लीमध्ये आजपासून पेट्रोल १०१.८४ रुपये प्रतिलिटर दराने मिळत आहे.
काही शहरांमध्ये तर डिझेलनं देखील शंभरी गाठण्यासाठी पेट्रोलसोबत स्पर्धा लावली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसनं देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या विरोधात आदोलनं देखील केली आहेत. सातत्याने वाढणाऱ्या किंमती आणि महागाईवरून काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केंद्रातील मोदी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. उत्तराखंडच्या दौऱ्यावर असलेल्या पायलट यांनी डेहरादून येथे पत्रकार परिषद घेतली.
‘आजच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर शुद्ध देशी तुपापेक्षाही जास्त झाल्या आहेत’ असा टोला त्यांनी लगावला आहे. ‘गेल्या ६ महिन्यांत देशात पेट्रोलच्या किंमती जवळपास ६६ वेळा वाढल्या आहेत. इंधन दरवाढीमुळे सर्वच गोष्टी महाग होत आहेत. त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होत असल्याचं देखील पायलट यांनी सांगितलं आहे.
देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे अनेक कुटुंबांना पुरेसं अन्न देखील मिळत नाही. यावरूनच केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा महागाई वाढवण्याचंच धोरण असल्याचं दिसून येत आहे असा आरोप पायलट यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पंकजा मुंडे नव्हे तर त्यांचे समर्थक नाराज आहेत’, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांची तालिबान्यांकडून हत्या
- ‘पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील ती कारवाई म्हणजे अफवा’, कार्यकारी संचालकाचे स्पष्टीकरण
- मालाडमध्ये झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरुवात; आ. भातखळकर पोलिसांच्या ताब्यात
- प्रेग्नेन्सीमुळे उर्मिला ट्रोल; हेमांगीनंतर तिचेही ट्रोलर्सला सडेतोड उत्तर


