परभणी : परभणी जिल्ह्यात पोलीस दलात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यातील दहा लाखांची रक्कम स्विकारताना मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला शनिवारी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी डीवायएसपी राजेंद्र पाल यांच्यासह दोघांवर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, परभणीच्या सेलू पोलीस ठाण्यांतर्गत ३ मे २०२१ रोजी एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर ९ जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलून, ‘तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये दे’ असे सांगितले. तसेच ठाण्यात नेहमी बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
परंतू तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील एसीबीच्या कार्यालयात तक्रार दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीत, त्यातील एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून डीवायएसपी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण याला दहा लाख रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी सेलू ठाण्यात पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कौरव आणि भाजप नेत्यांची भाषा एकच.. शेवट आपल्याला माहितीच आहे’
- ‘हा झटपट दौरा दु:ख पुसायला आहे की कडे निखळलेला डोंगर पाहायला?’
- संभाजीराजेंच्या पत्राला बिपीन रावत यांचा प्रतिसाद, पूरग्रस्त भागात सैन्यदलाच्या तुकड्या दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी’
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला


