मुंबई : कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रावर आस्मानी संकट कोसळले आहे. अनेकांचा पावसाने बळी गेला आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासठी प्रशासन सतर्क असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा सोडू नये अशा सूचना दिल्या आहेत. यावरच संधी साधत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधला आहे.
‘परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा सोडू नका अशी सूचना मंत्री व आमदारांना अजित पवारांनी दिली आहे म्हणे. बहुधा मुख्यमंत्र्यांना घर न सोडण्याचीही सूचना अजित पवारांनीच दिली असावी’ अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी समाज माध्यमावर मुख्यमंत्री ठाकरेंना टोमणा मारला आहे.
शुक्रवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा जबरदस्त तडाखा बसला. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, त्या त्या जिल्ह्यातील मंत्रिमंडळातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांना परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगडमधील दुर्घटनाग्रस्त तळीये (ता.महाड) गावाला भेट देणार आहेत. मुंबईतून हेलिकॉप्टरने महाड एमआयडीसीला जाणार आहेत. तिथून मुख्यमंत्री मोटारीने तळीयेला पोहोचणार आहे. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.३० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील. तळीयेला पोहोचल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची विचारपूस करतील. त्यानंतर प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतील, अशी माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इतका वेगवान मुख्यमंत्री देशाच्या इतिहासातही झाला नसेल!’, भाजपचा टोला
- मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनाग्रस्त तळीये गावाला देणार भेट
- ‘संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे पळकुटे मंत्री’
- दोन मुलांचे धोरण देशभरात राबवणार का?, केंद्राने संसदेत दिले ‘हे’ उत्तर
- ‘डोक्यावर मृत्यू दिसत असूनही नागरिकांना मरणासाठी का सोडले?, भाजपाचा संतप्त सवाल

