नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया तब्बल संघ २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसह ३ एकदिवसीय आणि १ टी२० सामना खेळला जाणार आहे. रावळपिंडी मैदानावरवर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील दुसरा सामना १२ मार्चपासून तर तिसरा सामना २१ मार्चपासून खेळला जाणार आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे हा सामना सुरू असतानाच दुसरीकडे पाकिस्तानाच्या पेशावर शहरात आत्मघाती हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत ४६ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. म्हत्वाचे म्हणजे पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला ऑस्ट्रेलियन संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे. ते हॉटेल हल्ल्याच्या ठिकाणापासून फक्त २० किमी अंतरावर आहे. या हल्ल्यामुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड तणावाखाली आले आहे. ३ मार्च २००९ ला श्रीलंका संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये १० वर्ष एकही कसोटी सामना खेळला गेला नव्हता.
पाकिस्तान बोर्ड आतापर्यंत युएईमध्येच घरच्या सामन्यांचे आयोजन करत होते. २०१९ मध्ये श्रीलंकेने पाकिस्तानमध्ये फक्त एक कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दौरा केला होता. २०२१ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने तेथे दोन कसोटी सामने खेळले होते.
गेल्या वर्षी न्यूझीलंड संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी गेला होता. परंतु त्यांना धमक्या मिळाल्यानंतर त्यांनी खेळण्यास नकार दिला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा केला होता. परंतु त्यांनीही पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. आता ऑस्ट्रेलिया संघ तेथे खेळण्यासाठी गेला आहे. पण या दौऱ्यातील पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी देशात मोठा बॉम्बस्फोट झाला आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया संघ हा दौरा सुरू ठेवणार की मायदेशी परतणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. असे असतानाही ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

