परभणी : शहरासह जिल्ह्यातील सरकारी रुग्णालया बरोबरच खासगी कोविड सेंटरला जिल्हा प्रशासनाने शनिवारी मध्यरात्री ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. त्यामुळे डॉक्टरांसह रुग्ण व कुटूंबियांनी सुटकेचा निः श्वास सोडला आहे. आता कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा असल्याने रुग्णांना जिवदान देखील मिळणार आहे.
शनिवारी रात्री चाकण (जि. पुणे) येथून ऑक्सिजनचा टँकर रात्री उशिरा परभणीमध्ये दाखल झाला आहे. या वेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीच ऑक्सिजनचा टँकर एमआयडीसीतील साठवणुकीच्या ठिकाणी वळवण्यात आला आहे. त्या टँकरमधून १८ केएल एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यापुर्वी बीड, जालना मार्गावरुन आलेल्या टँकरमधून २ केेएल ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला होता. परंतू हा साठा मुबलक नसल्याने जिल्हा प्रशासनाने पुन्हा ऑक्सिजनचा साठा मिळण्याची मागणी
केली होती.
सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये देखील हे ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला आहे. आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील गरजेनुसार ऑक्सिजनचा साठा असल्याने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खुप मोठी मदत होणार आहे. महसुल व पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ऑक्सिजनचे वितरण करण्यात आले. दरम्यान, एमआयडीसीतील खासगी प्रकल्पास हैद्राबाद येथून ५ केेएल क्षमतेचा ऑक्सिजनचा साठा रविवारी संध्याकाळपर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा काही प्रमाणात कमी झाला आहे. मागणी प्रमाणे बेल्लारी (कर्नाटक) येथून ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

