🕒 1 min read
औरंगाबाद : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मद्यपी पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासात मुसक्या आवळल्या. आण्णा उत्तम जाधव (रा. बाजारसावंगी ता. खुलताबाद) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी मयताची पत्नीनंदा आण्णा जाधव ( ३०) आणि तिचा प्रियकर काकासाहेब सर्जेराव खुटे (३५, रा. दरेगांव ता. खुलताबाद) यांना अटक केली आहे. अण्णा जाधव नेहमी दारू पिऊन त्रास देत असल्यानेच नंदाने खुटेच्या मदतीने जाधवची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
शिऊर हद्यीत गारज शिवारात कारखान्याच्या पडीक जमीनीवर सोमवारी आण्णा जाधव यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या गळ्यावर व चेहऱ्यावर जखमा झालेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा तपास करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती व तांत्रिक तपासात काकासाहेब खुटे याने खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून खुटेला चौकशीसाठी ताब्यात घेऊन विचारपुस केली. तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली देत सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आण्णा जाधव हा दारु पिऊन त्याची पत्नी नंदा हिला नेहमी शिवीगाळ करुन मारहाण करत असे. खुटेची पत्नी व नंदा जाधव या मैत्रीणी असल्याने नंदा खुटेच्या पत्नीला व खुटेला आण्णा जाधव याची समजूत घालण्यासाठी घरी बोलावून घेत होती. त्यातूनच नंदा जाधव आणि खुटेचे प्रेमसंबंध जुळल होते. दरम्यानच्या काळात नंदा जाधव हिला तिचा पती आण्णा जाधव हा दारु पिऊन मारहाण करुन तिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्याच्या अशा वागण्याला नंदा जाधव वैतागली होती.
नंदाने २२ मे रोजी खुटेला फोन केला. तेव्हा तिने ‘तो मला नको झाला आहे, त्याचे काही तरी करुन टाक’, असे सांगितले. त्यावेळी खुटेने काही तरी व्यवस्था करतो असे नंदाला सांगितले. त्यानंतर २३ मे रोजी नंदा व खुटेचे सकाळ पासुन फोनवर बोलणे झाले. त्यावेळी दोघांनी आण्णा जाधव हा प्रेमसंबंधाला अडथळा निर्माण करत होता. म्हणुन त्यांना जिवे मारण्याचे ठरविले. त्यानंतर खुटेने अण्णा जाधव यांना दुपारी बारा वाजेच्या सुमारास फोन करुन कोठे आहे ? याबाबत विचारणा केली असता त्यांनी गावातच असल्याचे सांगितले, त्यानंतर दुपारी एक वाजेच्या दरम्यान खुटेने नंदाला सांगितले कि, ‘मला फोन करु नको, त्याचे आज रात्री काम करुन टाकतो.
खुटेने स्वतःचा फोन दुपारी तीन वाजेच्या सुमारास बंद केला. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आण्णा जाधव यांना बाजारसावंगीत गाठले. आपण दोघे नातेवाईकाकडे जावून पैसे घेऊन येऊ असे सांगुन खुटेने आण्णा जाधव यांनादुचाकीवर चिकलठाण, पाणपोई मार्गे औराळा येथे नेले. दरम्यान रस्त्यात आण्णा जाधवचा मोबाईल घेऊन तो बंद करून स्वतःजवळ ठेवला. त्यानंतर शिऊर बंगला, गारज गावाच्या पुढे मोकळ्या जागेत आण्णा जाधवला घेऊन गेला. तेथे थोडावेळ थांबून आजुबाजुस कोणी नाही याची खात्री झाल्यावर खुटेने कमरेचा बेल्ट काढून बाजूला ठेवला. त्यानंतर आण्णा जाधव यांना बोलण्यामध्ये गंतुन ठेवत दगडाने मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर कमरेच्या बेल्ट व आण्णा जाधव याचे कमरेचा करदोडा काढून त्यांचा गळा आवळला.
मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर तेथून खुटे बाजारसावंगीला आला. २४ मे रोजी सकाळी नंदाला फोन करून ‘आण्णा जाधवला ठार मारले असुन, तु आता इकडे येऊन जा,’ असे सांगितले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून दुचाकी व मोबाईल जप्त केला आहे. दोघांना शिऊर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उप निरिक्षक संदीप सोळंके, गणेश राऊत, पोलीस शिपाई विक्रम देशमुख, विठ्ठल राख, दिपेश नागझरे, पोलीस नाईक वाल्मीक निकम, शेख नदीम, उमेश बकले, ज्ञानेश्वर मेटे, गणेश गांगवे, रामेश्वर धापसे, योगेश तरमाळे, संजय तांदळे यांनी केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरख शेळके हे करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आपली भूमिका-खा.संभाजीराजे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
