बीड: शनिवारी बीड शहरातील शिवसंग्राम भवनात दुपारी पत्रकार परिषद घेऊन आमदार विनायक मेटे यांनी आता मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा तीव्र केला आहे. येत्या ५ जून रोजी राज्यातील पहिला मोठा मोर्चा निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा मोर्चा राज्यसरकारला ‘सळो की पळो’ करून सोडणारा असणार आहे, लॉकडाऊन जरी असले तरी आता माघार घेतली जाणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केलं आहे. येत्या १८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना इशारा निवेदन देण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या गाड्या अडवल्या जाणार असल्याचा इशारा देखील या वेळी मेटे यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार मेटे म्हणाले की, मराठा आरक्षण रद्द झाल्याने सध्या समाजबांधव संतप्त आहेत. आता आरक्षणप्रश्नी पुन्हा एकदा मराठा समाज रस्त्यावर येणार आहे. येत्या १८ मे रोजी मराठा समाज बांधव महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना सकाळी ११ वाजता इशारा निवेदन देणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांची वाहनेही अडवली जाणार आहेत. मराठा समाजाचे आरक्षण प्रश्नी होणारी आंदोलने दडपण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केले आहे. आगामी जून महिन्यात राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असले तरी मोर्चा रद्द होणार नाही. म्हणून आरक्षण प्रश्नी येत्या ५ जून रोजी बीडमध्ये आरक्षण प्रश्नी पहिला मोठा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यात कोरोनाचे सर्व नियम पाळून व कायदा, सुव्यवस्था सांभाळून घोंगडी बैठका सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनजागृती केली जाणार आहे. ज्या ज्या समाजाला आरक्षण पाहिजे त्या त्या समाजाला बरोबर घेऊन बीडमध्ये मोर्चा काढला जाणार आहे. आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात बीडमधून होणार आहे.
मागच्यासारखा हा मूक मोर्चा नसेल. राज्य सरकारला सळो की पळो करून सोडणारा मोर्चा असेल. त्याच बरोबर राज्य सरकारचे नाकर्तेपण उघड करणारा असणारा आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल राज्य सरकारचा दृष्टिकोन कसा आहे हे सांगणारा हा मोर्चा असणार आहे, असे आमदार विनायक मेटे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मुस्लिम, ब्राह्मण, लिंगायत, धनगर या समाजालाही आरक्षण देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. या समाज बांधवांना आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात एकत्र करून आरक्षणाची लढाई लढणार आहोत. त्यामुळे राज्य सरकारला आता सर्वांच्या आरक्षणाबाबतीत निर्णय घ्यावाच लागेल, असे आमदार मेटे यांनी सांगितले. सर्वांना आरक्षण पाहिजे असल्याने प्रत्येकाने पक्ष, संघटना, गट,तट, व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून सर्वांनी येत्या ५ जून २०२१ रोजी निघणाऱ्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार विनायक मेटे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- तेथून बाहेर पडण्यासाठी मला पोलीस बोलवावे लागले ; सेहवागनं सांगितला अविस्मरणीय किस्सा
- ‘तोक्ते’चे संकट, मुख्यमंत्री ठाकरेंची अमित शाहांसोबत चर्चा
- ‘जमिनीशी घट्ट नातं असलेला युवा नेता गमावला..’, धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना
- भाजप खा.गौतम ‘गंभीर’ अडचणीत, ‘त्या’ ट्विटमुळे पोलिसांचा ससेमिरा मागे
- ‘सातव यांच्या निधनाने मनाला अत्यंत वेदना झाल्या’, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

