🕒 1 min read
औरंगाबादः सातारा परिसरातील नव्या बीड बायपास रोडचे काम नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. येणाऱ्या महिनाभरात याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांसाठी आणि वाहतुकीसाठी हा रस्ता लवकरच खुला केला जाईल.
शहराच्या आतून जाणाऱ्या जुन्या बीडबायपास रोडवरील पुलाचे कामही सुरु आहे. भर पावसाळ्यात या पुलाच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. या रोडवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे अपघातदेखील घडत आहेत. नवा बीडबायपास रोड हा आडगाव ते करोडी ३० किमी लांबीचा आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना हा मार्ग शहराबाहेरून जाईल. त्याचा मार्ग आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, कांचनवाडी, वळदगाव, करोडी, माळीवाडा असा आहे. नवीन बायपासचे काम २०१८ मध्ये सुरू झाले.
ऑगस्ट २०२१ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला दिलेली होती. मात्र, कोरोनामध्ये मजूर, अभियंते आपापल्या गावी गेल्याने हे काम रखडले. त्यामुळे एनएचएआयने ठेकेदाराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. आता नोव्हेंबरअखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल. ३० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर लहान-मोठे एकूण ११२ पूल आहेत. तसेच कांचनवाडी, एएस क्लब येथे दोन उड्डाणपूल असतील.
या रस्त्याच्या बांधकामासाठी एकूण ६१३ कोटी रुपये खर्च आला आहे. रस्त्यावर कांचनवाडी ते करोडीपर्यंत सर्व्हिस रोड असेल तर आडगाव, गांधेली, देवळाई, सातारा, एसआरपीएफ कँप, वाळूज लिंक रोड, तिसगाव चौफुली, करोडी येथे भुयारी मार्ग असेल. केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे प्रयत्नशील आहेत. ऐनवेळी गडकरींनी औरंगाबादमध्ये येण्यास नकार दिला तर त्यांच्याच हस्ते आभासी पद्धतीने ऑनलाइन उद्घाटन करण्याचाही पर्याय या नेत्यांनी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी मान्य केले की ते घरकोंबडे आहेत’
- अजित पवार बनवाबनवी आणि फसवाफसवी थांबवा- किरीट सोमय्या
- मलिक पुन्हा करणार एक गौप्यस्फोट, ‘मिलते है रविवार को’ म्हणत दिला इशारा!
- राज ‘का’ कारण! सहानुभूतीची लाट आणि एकजुटीमुळेच देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय
- राजकारणात २५-३० वर्षांपूर्वी आम्हीही नको ती अंडी उबवली; मुख्यमंत्र्यांचा जुन्या युतीवरून भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
