🕒 1 min read
गुढीपाडव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर सभा झाली. राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मात्र महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्यांचे दोन मुद्दे चांगलेच गाजले. एक तर मशिदीसमोर स्पिकरवर हनुमान चालिसा लावण्याचा तर दुसरा मुद्दा शरद पवारांमुळे जातीयवाद वाढत असल्याचा. यामुळे राज ठाकरे सरडा आहेत रंग बदलतात, राजकीय भूमिका बदलतात, अशी टीका त्यांच्यावर होत आहे. मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे, अशी टीकाही राज ठाकरेंवर केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मात्र राजकारणात सगळे एकाच माळेचे मनी असतात, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. आज राज ठाकरेंवर टीका करणाऱ्यांनी एकेकाळी हिंदुत्वाचा आधार घेतला होता, मतांसाठी आपली भूमिका बदलली होती. त्यामुळे इथं कोणी धुतल्या तांदळाचे नाही. २०१९ मध्ये शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादीचे नेते आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी भगवा फडकवण्याची घोषणा केली होती. १० जून १९९९ रोजी शिवाजी पार्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून घड्याळाचं बोधचिन्ह असलेला झेंडा होता. मात्र यापुढे दोन झेंडे फडकतील. छत्रपती शिवाजी महाराज ही कोणाची जहागिरी नव्हती, कोणा एकट्याची मालकी नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहेत’ असं म्हणत अजित पवारांनी महाराजांचं छायाचित्र असलेला भगवा झेंडाही राष्ट्रवादी आगामी सभांमध्ये फडकवणार असल्याचं जाहीर केलं होतं. शिवसेनेला शह देण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. त्यानंतर धर्मनिरपेक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या या निर्णयाला विरोध केला होता. हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे त्यांना म्हटले होते. त्यामुळे पक्षातील अजित पवारांच्या जागेवर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पक्षात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भूमिका परस्पर विरोधी असल्याचे चित्र निर्माण झाले होते.
राज ठाकरेंच्या वक्तव्याला अजिबात पाठिंबा नाही. पण राज यांच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेला बोट ठेवण्याचा अधिकार आहे का?, असा प्रश्न उपस्थित होतो. “जातीपातीचे राजकारण बंद करा, आधी झेंडा बघा भगवा, निळा, हिरवा”, अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी फेसबूकवर राज ठाकरेंना टोला लगावत केली होती. मात्र, मनसेच्या झेंड्यावर प्रश्न करणारे जितेंद्र आव्हाड यांनी आमदार रोहित पवारांनी अहमदनगरच्या खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यासमोर उभारलेल्या भगवा ध्वजावर टीका का केली नाही, तसेच २०१९ मध्ये अजित पवारांना विरोध का केला नाही. आता जरी राज ठाकरेंना व त्यांच्या भूमिकेला विरोध होत असला तरी निवडणूक आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला देखील हिंदुत्वाचा आधार घ्यावा लागला आहे. हे २०१९ च्या निवणुकीत स्पष्ट झाले आहे.
राज्यात सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांचे सरकार आहे. कधीकाळी कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना आज मांडीला मांडी लावून सत्तेत बसले आहेत. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्वाशी तडजोड केली का? की राष्ट्रवादी काँग्रसने भूमिका बदलली, हा खरा प्रश्न आहे. ज्यांनी सत्तेसाठी स्वतःच्या वैचारिक विचारांशी तडजोड केली, त्यांनी राज ठाकरेंवर टीका करणे कितपत योग्य आहे.
पवारांनी राजकीय कारकिर्दीत किती वेळा रंग बदललेत?
या विषयावर आम्ही भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे मत जाणून घेतले. उपाध्ये म्हणाले, इतर पक्ष सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करतात. मात्र भाजप कायम हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करते. भाजप कधीच तात्पुरत धोरण आखत नाही. राम मंदिराच्या बाबतीत देखील हे स्पष्ट झाले आहे. मात्र इतर पक्ष या मुद्द्यांचा त्यांच्या सोयीनुसार राजकारणासाठी उपयोग करतात.
राज ठाकरेंना रंग बदलणारा सरडा वैगेरे म्हणणे ठीक आहे. पण १९७८ मध्ये वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोदचं सरकार स्थापन करत राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. पुन्हा १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली. पुन्हा १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधींच्या परदेशी नागरिकत्वाच्या मुद्दयावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. पुन्हा सत्तेसाठी काँग्रेसच्या जवळ गेले. सरकारमध्ये मंत्रिपदे घेतली. २०१४ मध्ये भाजपा सरकार स्थापन करणार हे जाणताच थेट न मागता पाठिंबा द्यायला पवारच पुढे आले. बरं ते जाऊ द्या. २०१९ मध्ये भाजपासोबत सरकारमध्ये येण्यासाठी धडपड केली. पहाटेचा शपथविधी झाला. परत त्याच पुतण्याला पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री बनवत महाविकास आघाडीचं सरकार बनवलं. पवारांनी राजकीय कारकिर्दीत किती वेळा रंग बदललेत?, अस मत केशव उपाध्ये यांनी मांडले.
फडणवीस सरकार असताना भोंग्यांचा मुद्दा का आठवला नाही?
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, राज ठाकरेंच्या पक्षाचा झेंडा आधी हिरवा होता. त्यांच्या आधीच्या भाषणात कधी धर्म नव्हता. यापूर्वी अचानक ते गुजरातला गेले त्यांनतर मोदीची प्रशंसा करायला लागले. त्यानंतर लाव रे तो व्हिडीओद्वारे भाजपवर निशाणा साधला. मोदी कसे खोटं बोलले हे त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर त्यांची ईडीने चौकशी केली. चौकशीनंतर राज ठाकरे म्हणाले होते मी बोलत राहणार, गप्प बसणार नाही. मात्र लक्षात घेण्यासारखे आहे की त्यानंतर राज ठाकरे भाजप विरोधात बोलले नाहीत. कोरोना काळात मंदिर उघडण्याची मागणी त्यांनी केली. भाजपच्या समर्थनात भूमिका घेतल्या. शिवसेनेवर टीका केली. आता धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे असे, विधान करीत आहेत. शिवसेनेची हिंदू मतं मनसेला कमी करायची आहेत. फडणवीस सरकार असताना राज ठाकरेंना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा का आठवला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर देसाई म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेसचे अपत्य आहे. त्यांनी कधी धर्माचा मुद्दा केला नाही. मात्र हिंदूंमध्ये द्वेष निर्माण करुन त्याचा फायदा घेण्याचे काम सध्या सुरु आहे. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवारांनी देखील भगवा झेंडा फडकवण्याची घोषणा केली होती. यावर हेमंत देसाई म्हणाले, तेव्हा अजित पवारांना शरद पवारांनी झापले होते. ती त्यांची वैयक्तिक भूमिका होती, मात्र पक्षाची भूमिका शरद पवार ठरवत असतात. राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्याचा सध्या प्रयत्न होत आहे.
महत्वाच्या बातम्या
IPL 2022 : एक ओव्हर आणि ३५ रन्स..! मुंबईच्या गोलंदाजाला कमिन्सनं धुतलं; पाहा तुफानी बॅटिंगचा VIDEO!
सत्ताधाऱ्यांना सणसणीत उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची होणार ‘उत्तर’सभा
शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”
IPL 2022 : सेहवागनं रोहित शर्माला म्हटलं वडापाव? वीरूच्या ‘त्या’ ट्वीटवरून मुंबईकर पेटले!
वसंत मोरेंची पदावरून हकालपट्टी, साईनाथ बाबरांकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
