मुंबई: जागतिक हवामान संस्थेच्या 2020 या वर्षासाठीच्या अहवालातही तेच म्हटले आहे. या अहवालात जागतिक तापमानात झालेली वाढ, हरितगृह वायूचे वाढलेले प्रमाण, अतिवृष्टी, चक्रीवादळांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्याचा जगावर झालेला परिणाम याबाबतचे निष्कर्ष मांडले आहेत. त्यातील हवामान बदलाचा सर्वाधिक फटका आशियाई देशांना आणि त्यातही चीन तसेच भारताला बसल्याचा निष्कर्ष आपल्यासाठी महत्त्वाचा असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
मान्सूनच्या लहरीपणाचा अनुभव आपल्या देशाला नवीन नाही. अलीकडील काही दशकांत या लहरीपणाला हवामानातील बदलांची, ग्लोबल वॉर्मिंगची जोड मिळाली आहे. त्यामुळे अनियमित आणि अनिर्बंध पाऊस हे आपल्या मान्सूनचे वैशिष्टय़ झाले आहे. याही वर्षी त्यापेक्षा वेगळे काही घडले नाही. अगदी परतीच्या मान्सूननेदेखील महाराष्ट्रासह केरळ, तामीळनाडू आणि उत्तरेतील राज्यांना जाताजाता महापुराचे तडाखे दिलेच. केरळमध्ये तर गेल्या आठवडय़ात तुफान पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये किमान 35 जणांचा बळी गेला. शेती, घरे आणि इतर स्थावर मालमत्तेचे नुकसान झाले ते वेगळेच. मागील काही वर्षांपासून लहरी मान्सून आणि नैसर्गिक आपत्तींचे शुक्लकाष्ठच देशाच्या मागे लागले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात भारतात मान्सून आणि चक्रीवादळे असा ‘खो-खो’ पाहायला मिळाला. ‘तौकते’ आणि ‘गुलाब’ या दोन चक्रीवादळांच्या मध्ये पाऊस असा मान्सूनचा एक नवीन ‘स्ट्रेन’ या वर्षी दिसला. कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर चक्रीवादळ आणि पाठोपाठ तुफान पावसाचा तडाखा असे चक्र दिसले. हवामान बदलांचा हा नवा ‘स्ट्रेन’ आपल्यासाठी नक्कीच घातक आहे. कोरोनाच्या नवनवीन ‘स्ट्रेन’चा जसा सगळय़ांनी धसका घेतला आहे तसा हवामान बदलाच्या ‘स्ट्रेन’चाही घ्यावा लागेल. निसर्ग इशारे देत आहे. जागतिक हवामान संस्था, इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंजसारख्या संघटना त्याची जाणीव करून देत आहेत. सरकार आणि समाज दोघांनीही हा धोका समजून घेत जागे व्हायला हवे. असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबीचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘सरकार आणि समाजाने हवामानाचा धोका समजून घ्यावा अन्यथा…’,’सामना’तून राऊतांचा इशारा
- मोदी कायद्यापेक्षा मोठे नाहीत; पेगाससवरून कॉंग्रेसचा टोला
- किरण गोसावीला अटक करण्यात पुणे पोलीस यशस्वी
- ‘..तर मी राजीनामा तर देईलच पण राजकारणातून संन्यासही घेईल’ : नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

