नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन कमी झाल्याने आतापर्यंत २२ रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे.
नाशिक महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात येत आहे. विकी जाधव या तरुणाची आजी या दवाखान्यात होती. त्याच ऐकाल तर रात्री पासून या ठिकाणी ऑक्सिजनच नव्हता. ‘सकाळी ९ वाजता आजी अत्यावस्थ झाल्याचा फोन मला आला पाहतो तर ऑक्सिजन पुरवठा शून्य होता. कोणी काही सांगायला तयार नव्हत खाली जाऊन पाहिलं तर यांची ऑक्सिजन टाकी लिक झालेली होती. आता माझी आजी तर यांनी मारली आहे, पण याची जबादारी कोण घेणार हे तर सांगा’. अशी तीव्र प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे.
दुसरीकडे मात्र या दुर्घटनेनंतर गेंड्याचे कातडे असणाऱ्या राजकीय नेत्यांनी आपली थोबाड उघडत राजकारण करण्यास सुरवात केली आहे. ‘निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात ? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले’. अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. तर, ‘ठाकरे सरकार लोकांचे आणखी किती तळतळाट घेणार’? अशी टीका करायला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी क्षणाचाही विलंब केला नाहीये.
प्रशासन मात्र कारवाईचे कागदी घोडे नाचवायला तयार झाले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जाईल. जो कोणी दोषी असेल त्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. सध्या तरी हलवले जाणार नाही, रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु झाला आहे, अशी माहिती नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. तर ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे. लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
या दुर्घटनेत अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. कोणाचा भाऊ गेलाय, कोणाची आई गेली तर कोणाचा बाप गेल्याने या कुटुंबाना कोणी आधार द्यायचा या प्रश्नाचे उत्तर राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी देणार आहेत का ? अचानक ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्याने संपूर्ण वार्डने तडफडून जीव सोडला. आमच्या माणसांचे मारेकरी कोण असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि राजकीय नेत्यांची नसलेली इच्छाशक्ती यांनी निष्पाप रुग्णांचा ‘खून’ केला हे तितकच खरं.
महत्वाच्या बातम्या
- मी देशासाठी मरतो, पण माझ्या पत्नीला रुग्णालय मिळेना; BSF जवानाची हतबलता
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- आयपीएलमध्ये आज केकेआर विरुद्ध सीएसके; केकेआरपुढे पराभवाची मालिका खंडीत करण्याचे आव्हान
- आयपीएलमध्ये आज पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद; पहिल्या विजयासाठी हैदराबाद उत्सुक
- मोदी सरकार गाफील राहिल्याने कोरोना रुग्णांचे हाल-प्रियंका वाड्रा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

