मुंबई : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. एकीकडे या पदासाठी कॉंग्रेस आग्रही होते. तर, महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी देखील या पदावर दावा केल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे चित्र होते. आता विधानसभा अध्यक्ष पद हे कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षपदाची नवडणूक व्हावी अशी आग्रही मागणी कॉंग्रेसची होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक आमदार गैरहजर आहेत. त्यामुळे या अधिवेशनात निवडणूक घेण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नसल्याचे समजते आहे. आज काँग्रेस नेत्यांची विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर चांगलेच संतापल्याचे वृत्त आहे.
विधानभवनात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेस गट नेते बाळासाहेब थोरात, उर्जा मंत्री नितीन राऊत, कॅबिनेट मंत्री सुनिल केदर यांच्यासह इतर आमदार उपस्थितीत होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे चांगलेच भडकले होते. विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलेल्या विरोधावरून पटोले कमालीचे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी, अशी आग्रहाची मागणी काँग्रेसने केली होती. पण, यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनुकूल नसल्याने पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.
अध्यक्ष निवडीची प्रक्रियेसाठी किमान तीन दिवस लागतात. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरायचा असतो त्याच्या आदल्या दिवशी तशी घोषणा करावी लागते. दुसऱ्या दिवशी अर्ज भरला जातो आणि तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष निवडणूक होत असते. आज आणि उद्या असे दोनच दिवस अधिवेशनाचे राहिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणुक होणार नसल्याची माहिती काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्र्यांवर आरोपांची सरबत्ती, मात्र फडणवीस सरकारच्या तुलनेत ठाकरे सरकारच्या काळात महिला अत्याचारात घट !
- विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच, ‘या’ नेत्याचे नाव निश्चित ?
- अजितदादांनी अर्थसंकल्पातून महिलांबाबत केलेल्या घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक ?
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य


