मुंबई : कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. एकीकडे या पदासाठी कॉंग्रेस आग्रही होते. तर, महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी देखील या पदावर दावा केल्याने आघाडीत बिघाडी होण्याचे चित्र होते. मात्र, आता विधानसभा अध्यक्ष पद हे कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
काँग्रेस पक्षातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे निष्ठावान आमदार संग्राम थोपटे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते विधानसभा अध्यक्षपद मिळावे यासाठी दिल्लीत फिल्डिंग लावत असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे.
संग्राम थोपटे हे पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. २००९ पासून सातत्याने ते या मतदारसंघातून निवडूण येत आहेत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे ते चिरंजीव आहेत. यावेळी मंत्रीमंडळात थोपटे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनात राडा केला होता.
संग्राम थोपटे यांची पवार घरण्याचे पारंपरिक विरोधक म्हणूनही ओळख आहे. यांच्याशिवाय काँग्रेसकडून परभणी जिल्ह्यातील पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर आणि मुबंईतील मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमिन पटेल यांचीही नावे चर्चेत होती. मात्र अखेर संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘१७ वर्षांपासूनच्या लढ्याला यश मिळाले’ अर्थसंकल्पानंतर शिवाजीराव आढळराव पाटीलांची प्रतिक्रिया
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य
- ‘महाराष्ट्रधर्म, हिंदवीस्वराज्य प्रथम’ म्हणत वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा !
- बाळासाहेब थोरात घटनाबाह्यरितीने काम करत आहेत, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडून काढून घेऊन NIA कडे देण्याची एवढी घाई का ?


