औरंगाबाद : भंडारा येथील बाल रुग्णालयाच्या कक्षाला आग लागून दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शहरात अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीची पाऊले उचलणे आवश्यक होते. फायर ऑडिटसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे शहर व जिल्ह्यातील मिळून ९३४ रुग्णालयांची यादी प्राप्त झाली होती. या सर्व रुग्णालयांचे ऑडिट करण्यासाठी मनुष्यबळाची मात्र वानवा असल्याने हे प्रकरण पुढे गेलेच नाही. सोमवारपासून (दि.२६) पुन्हा एकदा मनपाने फायर ऑडिट सुरु केले आहे.
नाशिक व विरार येथील रुग्णालयांमधील आगीच्या घटनेनंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील सर्व कोविड रूग्णालयांची आणि कोविड केअर सेंटरची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून ही तपासणी सुरु करण्यात आली आहे. मागे साडेतीन महिन्यांपूर्वी पालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील रुग्णालयांना फायर ऑडिटसंदर्भात नोटीसा दिल्या होत्या. मात्र त्यावर पुढील कारवाई आजवर झालेली नव्हती.
काही महिन्यांपूर्वी भंडारा येथील बाल रुग्णालयातील आगीच्या घटनेत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेच्यानंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व दवाखान्यांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार औरंगाबाद पालिकेच्या अग्निशमन विभागाने पालिकेचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून नोंदणी झालेल्या दवाखान्यांची माहिती मागवली होती. त्यांना प्राप्त माहितीनुसार, शहर व जिल्ह्यात मिळून ९३४ रुग्णालये आहेत. यात शासकीय, खासगी व पालिकेच्या दवाखान्यांचा समावेश आहे.
यातील सुमारे सव्वाशे दवाखान्यांना अग्निशमन विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. मात्र आता साडेतीन महिन्यांनंतर शुक्रवारी विरार येथील कोविड रुग्णालयातील भीषण आगीत चौदा कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर अग्निशमन विभागाने सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज डाॅ.दहीफळे कोविड सेंटर, डाॅ. ऊकडगावकर कोविड सेंटर, गजानन हाॅस्पीटल, जे.जे. हाॅस्पीटल याठिकाणी तपासणी करण्यात आली. असे पालिकेचे मुख्य अग्निशनम अधिकारी आर. के. सुरे यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- संतापजनक : नखांसाठी शिकाऱ्यांनी गरोदर वाघिणीला जाळलं
- ‘गांधी भवन’ लवकरच होणार कोविड सेंटर! शहर काँग्रेसचा ‘सकारात्मक’ पुढाकार
- योगींच्या उत्तर प्रदेशात मरणानंतरही हालच ; मृतदेह वेटिंग लिस्टवर, स्मशानभूमीत जागाच मिळेना !
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ना ऑक्सिजन ना व्हेंटिलेटर.. लातूरची परिस्थिती चिंताजनक


