🕒 1 min read
औरंगाबाद : मुंबई ते नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या दक्षिण बाजूने हा रेल्वेमार्ग असेल. समृद्धी महामार्गासाठी आधीच संपादित ६० टक्के जमीन यासाठी वापरली जाईल. उर्वरित ४० टक्के जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत केली जाईल. या पार्श्वभूमीवर बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यातील संबंधित गावातील शेतकऱ्यांना बाेलावून त्यांच्यासमाेर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी संपादित जमिनीला एकच भाव ठरवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाप्रमाणे ही बुलेट ट्रेनही ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा व नागपूर या दहा जिल्ह्यांमधून जाईल. रेल्वेत प्रवासी क्षमता ७५० असेल. प्रकल्पाची लांबी ७३९ किमी आहे. यात १४ स्थानके असतील. २८ तालुक्यांतील ३८७ गावांमधील १२४५.६१ हेक्टर जमीन त्यासाठी संपादित केली जाईल. या मार्गावर २५ किलाेमीटरचे एकूण १५ बोगदे असतील. यात सर्वाधिक लांब बोगदा ८.३६ किमीचा असेल. बुलेट ट्रेनचे थांबे ठाणे, शहापूर, घोटी बुद्रुक, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी व अजनी आदी थांबे देण्यात आले आहेत.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीला रेल्वे मंत्रालयाने देशातील ८ हाय स्पीड रेल कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम दिले आहे. त्यापैकी अहमदाबाद-मुंबई या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू असून नागपूर-मुंबईसह इतर प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे या कंपनीचे संयुक्त व्यवस्थापक अनिल शर्मा यांनी सांगितले. भूसंपादनाचा मावेजा शहरी भागातील बाजारभावाच्या किंवा वर्तुळाच्या रकमेच्या दुप्पट राहील, तर ग्रामीण भागातील बाजारमूल्याच्या चौपट राहील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मला हवं तेव्हा ईडीला सामोरं जाईन’; अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण
- मोदींच्या कार्यकाळात एकही भ्रष्ट्राचाराची केस समोर आली नाही, अर्थ राज्यमंत्र्यांचा दावा
- औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे आयटीआयला प्राधान्य!
- वैजापूरात मुख्यमंत्री-प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते निकृष्ट; आ. बोरनारेंची ठाकरे सरकारकडे निधीची मागणी!
- ‘मोदी सरकारच्या दबावातून काही जण महावसुली म्हणत बोंबलत आहेत, पण..’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
