पुणे: राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सांगलीतील एका सभेत कन्यादान बद्दल वक्तव्य केले होते. यावरून ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत, त्यांनी माझा व्हिडीओ पूर्णपणे तपासावा. मी कोणत्याही समाजाचं नाव घेतलेलं नाही. मी एका गावात कन्यादान सुरू असताना तेथे विरोध केला. कन्या हा काही दान करण्याचा विषय नाहीये. कन्यादान करत असताना स्थानिक महाराजांनी जो मंत्र उच्चार केला, त्याचा अर्थ फक्त समजावून सांगितला. त्यामुळे मी कोणत्याही समाजाबद्दल कोणताही अपशब्द वापरला नाही. असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
तसेच काही संघटना माफी मागा म्हणत आहेत. कशाची माफी मागायची? जे मला माफी मागा म्हणतायत, त्यांना माझा साधा प्रश्न आहे. आपल्या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊंची जी बदनामी केली गेली, यावर या लोकांनी माफी मागावी. त्यानंतर मी माफी मागायला तयार आहे. असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते मिटकरी?
सांगलीत सभेत मिटकरींनी एक किस्सा सांगितला होता. “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. कधी सुधरणार? असे अमोल मिटकरी यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- “जात पात धर्म हे आमच्या अंगाला…” ; धनंजय मुंडेंनी केली अमोल मिटकरींची पाठराखण
- “देश विकून जर पोट भरलं नसेल तर…”- संजय राऊत
- “मुख्यमंत्र्यांवर टीका करा आणि Y दर्जाची सुरक्षा मिळवा ही केंद्र सरकारची…”, नीलम गोऱ्हेंची टीका
- IPL 2022 : रक्तातच क्रिकेट..! अर्जुन तेंडुलकरच्या भेदक ‘यॉर्कर’वर इशान किशन क्लीन बोल्ड; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs CSK : मॅचपूर्वी चेन्नईच्या ‘स्टार’ खेळाडूनं सोडलं मैदान; ‘या’ कारणामुळं परतला मायदेशी!

