पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशील्ड’ या लसीच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांना लस घेण्यात आर्थिक अडचण निर्माण होण्याची भीती असल्याने काँग्रेसने दरवाढीचा निषेध करत मोफत लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन देशामध्ये लसीकरण हे केंद्र सरकारने मोफत करावे, अशी मागणी केली आहे. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकार एकिककडं भारताचा शत्रू अशी ओळख असलेल्या पाकिस्तानला मोफत लस देत आहे. मात्र देशातील नागरिकांना त्यासाठी पैसे मोजायला सांगत आहे. देशाला लस मोफत का देत नाही,’ असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला.
यासोबतच, पुनावाला हे कुणाचे मित्र आहेत, या भानगडीत मला पडायचे नाही. सरकारनं नागरिकांसाठी मोफत लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच, लसीची निर्मिती पुण्यात होते, त्यामुळे पुण्यात पत्रकार परिषद घेत असून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिल्याचे देखील नाना पटोले यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत
- ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी जबाबदार, राहुल गांधींचा आरोप
- केकेआर विरुद्ध राजस्थान यांच्यात लढत; आयपीएलमध्ये दोन्ही संघ गुणतालीकेत सर्वात खाली
- ‘देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, मात्र आता ते उतावीळपणा करतायत’
- कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर


