रत्नागिरी : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विधानसभेचं २ दिवशीय विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात अनेक वादळी घडामोडी घडल्या. शिंदे गट आणि भाजपने बहुमत चाचणी यशस्वीपणे पार पाडली. तसेच या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. यावेळी अधिवेशनात शिवसेनेचे दबंग नेते भास्करराव जाधव यांनी तुफान फटकेबाजी केली.
मात्र अधिवेशन संपताच भास्करराव जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात. त्यांनी कष्ट करून शेतात पिकवलेलं धान्य त्यांना वर्षभर पुरतं. समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदांवर पोहोचले तरी जाधव यांनी गावाकडची शेती सोडली नाही. जाधव यांच्या कामाची दाखल प्रसारमाध्यमांनी घेतली आहे.
यावेळी शेतीत काम करताना त्यांना विचारण्यात आलं कि, तुमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील एकप्रकारे नव्या पद्धतीने पक्षाची शेती आणि मशागत करतायत.याबद्दल तुम्ही काय सांगाल. यावर जाधव म्हणाले कि, हे शिवसेना नावाचं जे शेत आहे त्याची मालकी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे शिवसेनेची मालकी उद्धव ठाकरेंचीच आहे. माझ्यासारखे अनेक शिवसैनिक हे या शिवसेना नावाच्या शेताची मशागत करण्यासाठी कंबर बांधून तयार आहेत.
महत्वाच्या बातम्या


