मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांचे दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट, तेथे झालेला सीआरझेडचा भंग, वन व पर्यावरणाचे नुकसान, सरकारी दस्तावेजात खाडाखोड व मंत्रीपदाचा दुरुपयोग झाल्यासंबंधी तक्रार व दस्तावेज मिळाले असून, यासंबंधी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवणार असल्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपा शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली.
भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राच्या राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन अनिल परब यांच्या बेकायदा बांधकामाबाबत निवेदन व पुरावे दिले. यावेळी किरीट सोमय्या यांच्यासह खा. गोपाळ शेट्टी, आ. राम कदम, आ. मिहीर कोटेचा, आ. राहुल नार्वेकर, मुंबई महामंत्री संजय उपाध्याय, युवराज मोरे आणि सिद्धार्थ शर्मा आदी उपस्थित होते.
अनिल परब यांनी विभास साठे यांच्याकडून १ कोटी रुपये किमतीची मुरुड येथील ४२ गुंठे शेत जमीन विकत घेतली. त्यांनी जागेचा कब्जा घेतला, परंतु परब यांनी ही जागा स्वत:च्या नावावर केली नाही. त्यांनी सदानंद कदम यांच्या नावाने खरेदीखत केले. चार वर्षे परब यांनी ही जागा ‘बेनामी’ मिळकत म्हणून स्वत:कडे ठेवली व कोरोना काळात २२ डिलक्स खोल्यांचा ३ मजली बेकायदा रिसॉर्ट बांधला. अनिल परब यांनी भ्रष्टाचाराचा पैसा वापरून ही बेनामी मिळकत विकसित केली, असा किरीट सोमय्या यांचा आरोप आहे.
अनिल परब यांनी या रिसॉर्टसाठी कोणतेही परवाने घेतले नाहीत, सीआरझेडची अनुमती नाही, खोटे कागदपत्र दाखवण्यात आले, ग्रामपंचायत कार्यालयात फोर्जरी करून आता हा रिसॉर्ट २०१९ पूर्वीचा आहे, असे दाखवण्यात आले. अनिल परब यांनी जागेचा ताबा घेतला त्यावेळी या शेतजमिनीवर एक फूटही बांधकाम नव्हते, झोपडेही नव्हते. भाजपाच्या शिष्टमंडळाने या संबंधीचे गुगल मॅप, अर्थचे नकाशेही राज्यपालांना दाखवले. अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांच्या व्यवहाराची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) करावी, असा भाजपाचा आग्रह असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे राष्ट्रपतींना पत्र
- ‘आता राष्ट्रपती, पंतप्रधानांसाठी बेड्स राखीव ठेवण्याची गरज’, दिल्ली हायकोर्टाचे मत
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- काँग्रेस राज्यभरात देणार १११ ॲम्ब्युलन्ससह ६१ लाख मास्क, नाना पटोले यांची माहिती
- सातव कुटुंबीयांच्या सांत्वनास राहुल गांधी हिंगोलीला येणार


