पुणे- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ बुधवारी रद्दबातल ठरवला. ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. यानंतर राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
यातच आता माजी खासदार संजय काकडे यांनी देखील भाष्य केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा 1985 पासून सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते. शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या व्यतिरिक्त मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले. इतर कोणाही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले नाही असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर संजय काकडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. पुढे बोलताना काकडे म्हणाले, फडणवीस यांनी दिलेल्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने मान्यता देखील दिली होती. परंतु, या महाविकास आघाडी सरकारला ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकविता आले नाही. भाजपाची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजुनेच आहे. आता महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाविषयी काय भूमिका घेणार हे त्यांनी जाहीर करावे, असेही प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना मी ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चाललंय ते त्यांना आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत. शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘संजय काकडेंवर आता तुरुंगात जायची वेळ आलीये’, ‘त्या’ वक्तव्यावर नवाब मलिक संतापले
- ‘मोदीसाहेब, बंगालच्या पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?’, रुपाली चाकणकरांचा टोला
- औरंगाबादेत हेल्मेट सक्ती प्रकरण, हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
- निवडणूक संपल्याचा परिणाम; सलग तिसऱ्या दिवशी इंधन दरवाढ
- ‘कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नका’, पंतप्रधान मोदींचे राज्यांना आवाहन


