🕒 1 min read
औरंगाबाद : महापालिकेत दोन आरोग्य वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने राजकारण सुरू झाले आहे. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेले डॉ. पारस मंडलेचा यांना कार्यक्रमासाठी डावलल्याचा प्रकार समोर आला आहे. बजाज कंपनीने महापालिकेला एक लाख १२ हजार ५०० एवढ्या लसी दिल्या आहेत. त्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र देण्यात आले असून, या मोहिमेचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. पण याची पुसटसी कल्पना देखील डॉ. मंडलेचा यांना देण्यात आली नाही. त्यामुळे दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्य शासनाने डॉ. पारस मंडलेचा यांची बीड येथून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर दोन महिन्यांपूर्वी बदली केली आहे. त्यानुसार महापालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार त्यांच्याकडे देणे अपेक्षित होते. पण महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर व डॉ. मंडलेचा यांच्यात कामाची विभागणी करून दोघांची एकाच पदावर नियुक्ती केली. मात्र सध्या आरोग्य विभागात दोघांत शितयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे. बजाज कंपनीतर्फे देण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचे मंगळवारी ताठे मंगल कार्यालय येथे उद्घाटन करण्यात आले.
मात्र याची डॉ. मंडलेचा यांना कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे मंडलेचा यांनी लसीकरण केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता नळगीरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी सरोदे यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. विभागप्रमुख या नात्याने उद्घाटन कार्यक्रमाची माहिती देण्यात आलेली नाही.
तसेच लसीकरण केंद्र व वाटप याची माहिती अवगत करण्यात आलेली नाही, याबाबत २४ तासांच्या आत खुलासा करावा, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. महापालिकेतर्फे शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दररोज नियोजन केले जाते. त्याची जबाबदारी डॉ. पाडळकर यांच्याकडे आहे. पण विभागप्रमुख म्हणून लसीकरण केंद्रांची यादी डॉ. मंडलेचा यांना दिली जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देशाच्या संपत्तीची विक्री, आमदारांची खरेदी, इतकंच अर्थशास्त्र भाजपला कळतं’; राऊतांचा हल्लाबोल
- ‘सरकार मालमत्ता विक्रीत व्यस्त, तुम्हीच तुमची काळजी घ्या’, राहुल गांधींचे देशवासियांना आवाहन
- जयसिंगपुऱ्यात ड्रेनेजचे पाट पाहून आमदार प्रणिती शिंदे संतापल्या, ‘हा काय प्रकार आहे’?
- लाल चिखल! राज्य सरकारने सर्कस बनून शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये-सदाभाऊ खोत
- अफगाणिस्तानातील नव्या सत्तेबाबत भारत ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
