🕒 1 min read
वैजापूर : पांडुरंगाची पंढरी प्रत्येक वारकऱ्यासाठी आपले माहेरच असते. मात्र प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ जवळपास साडेतीनशे किलोमीटरचे अंतर अवघ्या सहा दिवसात पार करून पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होणारा एखादा अवलियाच असेल नाही. वैजापूर तालुक्यातील शिरजगाव येथील वामनराव गंगाधर निंबाळकर हे वयाची ८३ वर्ष ओलांडलेले शेतकरी-वारकरी आपल्या दिवंगत पत्नीच्या आठवणीत दर महिन्याला वारीच्या प्रवासावर निघतात. पुढील महिन्यात ते आपली पंचविसावी वारी पूर्ण करत आहेत.
वामनराव गंगाधर निंबाळकर उर्फ तात्या हे मूळ शिरजगाव येथील शेतकरी. वडिलोपार्जित असलेली शेती सावकाराने गिळंकृत केली. मात्र व्यथित न होता त्यांनी पुन्हा आपले बंधू कै. दगु निंबाळकर यांच्या मदतीने मेहनत करून आठ एकर शेती उभी केली. लहानपणापासूनच तात्यांना भजनाची आवड होती. आयुष्यात वारीची सुरवात त्यांनी एसटी बसने केली. आजपर्यंत एसटी बसने सहा वर्ष, ब्रम्हलीन नारायनगिरीजी महाराज यांच्या श्री क्षेत्र सरला बेट ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यात बारा वर्ष, गावातील श्री संत बैरागी महाराज दिंडी सोहळ्यात सात वर्षे असा पायी दिंडी वारी सोहळा केला आहे.
मार्च २०१९ मध्ये तात्यांची पत्नी सौ.भामाबाई वामनराव निंबाळकर(माई) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याचवेळी तात्यांनी माईंच्या स्मरणार्थ महिन्याच्या पायी वारीचा संकल्प बोलून दाखवला. सर्वाना ही गोष्ट अचंबित आणि अशक्य वाटली. कारण त्यांनी त्यावेळी वयाची ८० वर्षे ओलांडली होती. त्यांचे दोन्ही मुले भाऊसाहेब आणि सुनील यांनी तात्यांची प्रकृती पाहता तुम्ही हवे तर खासगी वाहनाने किंवा एसटीने वारी करा अशी समजूत घातली.
मात्र ते आपल्या संकल्पावर ठाम होते. त्यामुळे वडिलांच्या हट्टापुढे दोन्हीही मुलांचा नाईलाज झाला. त्याच्या पुढच्याच महिन्यात एप्रिल २०१९ मध्ये तात्यांनी पहिल्या मासिक पायी वारीची सुरवात केली. मध्यंतरी कोरोनामुळे वारीला एकदा अडचण आली आणि प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना राहुरी येथून पुन्हा माघारी यावे लागले होते. त्यामुळे ते आता वारीला निघण्यापूर्वी आपली कोविड टेस्ट करून सोबत प्रमाणपत्र घेऊनच निघतात. पुढच्या महिन्यात वामन तात्यांच्या वारीचे पंचवीस संकल्प पूर्ण होत आहेत. त्यांच्या पत्नी प्रेमाबद्दल आणि विठ्ठलाच्या निस्सिम भक्तीबाबत गावात आदराने बोलले जाते.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या घटनेने मन सुन्न, मी निःशब्द – तुकाराम मुंढे
- ‘फडणवीस, चंद्रकांत पाटलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- नैराश्यात गेलेल्या तरुणाईसाठी औरंगाबादेत मोफत समुपदेशन मोहीम
- माझी मम्मी तडफडून मेली हो…;रुग्णालयात लेकीचा हृदयद्रावक आक्रोश
- नाशिक : बेपर्वाई झाली असेल तर त्यांना कडक शासन व्हायलाच हवं – राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
