🕒 1 min read
मुंबई : आंदोलनापूर्वीच २ मे पासून महाविकासआघाडी सरकारने महाराष्ट्र सैनिकांची पोलिसांनी धरपकड केली, अनेकांना स्थानबद्ध केले, अनेकांना अटक केली, जेलमध्ये टाकले. आमच्या पदाधिकाऱ्यांना, त्यांचा कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला. अशा अनेक प्रकारे आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. पण आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरुन उरले, अशी टीका मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट शेअर करुन त्यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे.
सरदेसाई म्हणाले, जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनधिकृत भोंग्याचा आवाज बंद करुन सुद्धा दाखवला. महाराष्ट्रातील सल्तनतने पोलिसांवर दबाव टाकून नको त्या गुन्ह्यांची कलमे लावून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आम्ही जसे रस्त्यावर संघर्ष करुन न्याय मिळवतो. त्याच प्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढून, संघर्ष करुन, न्याय मिळवण्यात यशस्वी झालो, असे तसरदेसाई म्हणाले.
महाविकास आघाडी सल्तनतच्या या दमनशाहीला अंगावर घेऊन, महाराष्ट्रातील जनतेला आवाजाच्या त्रासातून मुक्त करणाऱ्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम. कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्व वकील मंडळी व महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष यांचे विशेष आभार आपले सहकारी अडचणीत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी धावपळ करणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना साष्टांग दंडवत. शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ. लावा ताकद. जय महाराष्ट्र, असे नितीन सरदेसाई यांनी ठणकावून सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
