मुंबई : राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार का? या चर्चांना उधाण आले आहे. यावर राष्ट्रवादीची भूमिका काय असणारं आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. काही झाले तरी शेवटपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. बैठक संपल्या नंतर जयंत पाटील यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.
“सरकार गेल्यानंतर विरोधी बाकावर बसायला लागणार आहे” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाला सहमती दर्शवत जयंत पाटील यांनी विरोधी बाकावर बसण्याची तयारी असल्याचं सांगितलं. त्याबरोबरच मुख्यमंत्री वर्षा सोडून मातोश्रीवर गेले आहेत हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
शिवसेनेला आमदार किती आहे याची आज काळजी करण्याची गरज नसल्याचं जयंत पाटील म्हणाले. “आतापर्यंत ज्यांनी शिवसेना सोडली आहे त्यांचा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव झाला असल्याचा इतिहास आहे” असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेच्या वेळी भाजपला साथ द्यायला हवी होती, अशी चर्चा राष्ट्रवादीच्या काही आमदारांमध्ये सुरू असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत जयंत पाटील यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “परिस्थिती बदलते तसं काही नवीन विधान आमदार करत असतात. ते पक्षाचे धोरण असू शकत नाही. एकदम सत्ता गेली तर काम होण्याच्या बाबतीत असे काही प्रश्न लोकांच्या मनात असतात. त्यावेळी अशी भाषा काही लोक वापरू शकतात, पण आम्ही एकत्रित बसतो तेव्हा कोणीही अशी भूमिका मांडली नाही” असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

