पुणे : पुण्यातील उरुळी फुरसुंगीतल्या ग्रामस्थांनी 5 दिवसांपासून कचरा डेपो बंद केल्यामुळे पुण्यातला कचराप्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी गेल्या चार दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. कचरा प्रश्नावर महापौर आणि आयुक्तांशी चर्चा करूनही अद्याप कोणताही तोडगा न निघाल्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरूच ठेवले असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं माजी आमदाराच्या नातेवाईकाच्या भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला हे कंत्राट दिलं आहे. या कंपनीला 23 कोटी 45 लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. मात्र, कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती साधनं नसल्याचं आढळून आल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. त्यामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका फुरसुंगी आणि तेथील स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे.
उरळी आणि फुरसुंगीकरांनी कचरा टाकू देण्यास मनाई केलीय. त्यामुळं गेल्या पाच दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नाही. त्यामुळं अनेक सोसायट्यांमध्ये कचरा तसाच पडून आहे. पुणेकर दररोज दोन हजार टन कचरा करतात, त्यापैकी फक्त 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. दुसरीकडं कचरा डेपोमुळं होणारं प्रदूषण, दुर्गंधी, साथीचे आजार आणि डासांची पैदास यामुळं उरळी आणि फुरसुंगीकर हैराण आहेत. दरम्यान, पालिका प्रशासननं ग्रामस्थांकडे 10 एप्रिलपर्यंतची मुदत मागितली आहे.
दरम्यान, 2015 मध्ये देखील याच कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, तेव्हाही कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक साधन सामग्री नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं 600 कोटींची तरतूद केलीय. तरीदेखील पुण्यात कचऱ्याचा प्रश्न निकाली लागत नाहीय.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

