नंदुरबार : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात महत्वाचं विधान केलं होतं. ‘एकत्र आले तर भावी सहकारी’ असं विधान करत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील मंचावर होते.
गेल्या दोन दिवसांतील नेत्यांच्या विधानांमुळे राजकीय क्षेत्रात भूकंपाच्या हालचालींच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या असतानाच आज आणखी एक मोठी घडामोड समोर येत आहे. आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते नंदुरबारमध्ये एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे हे नेते आणखी काही गौप्यस्फोट करतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे एकाच गाडीने या कार्यक्रमासाठी आले. हे दोन्ही महत्वाचे नेते एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी आल्याने उपस्थितांमध्ये देखील चर्चांना उधाण आले होते.
सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये आढळून आल्या अॅण्टीबॉडीज्
- ‘अडीच कोटी लसीकरणानंतर एका राजकीय पक्षाचा ताप वाढला’
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली


