मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
या गंभीर प्रकरणावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना तीव्र संताप व्यक्त करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं, आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना, दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात ? दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या ? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे,’ असं म्हणतानाच संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील दरेकर यांनी केली आहे.
‘या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतं आहे. धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेतयांसाठी करतंय, डान्स बारसाठी किंवा रेस्टोरंटवाल्यांसाठी काम करत आहे की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय, हे एकदा जनतेला कळलं पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे,’ असा घणाघात देखील प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ; गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील दुसरी शिलेदार ‘पी व्ही सिंधु’
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना


