औरंगाबाद: कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय त्वरित रद्द करावा. नाही तर शेतमाल विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. हेही जमत नसेल तर आम्ही आमचा शेतमाल विक्रीसाठी आणणारच, असा इशारा शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यासोबत चर्चा करताना दिला आहे. मागणीचे निवेदनही सादर केले.
बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या दोनशेवर गावांतील शेतकरी, शेतकरी नेते, संचालक मंडळ, ग्राहकांची आग्रही मागणी व आलेले निवेदन घेऊन सभापती राधाकिसन पठाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले होते. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित नसल्याने त्यांनीही निवासी उपजिल्हाधिकारी जाधवर यांना निवेदन दिले. एकदम बाजारपेठ बंद ठेवणे बरोबर नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अथवा बाजारपेठ सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्याची आग्रही मागणी केली. यावर जिल्हाधिकारीच निर्णय घेतील असे जाधवर यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ११ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये पहिले सात दिवस ११ ते १७ मार्च दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. यामुळे शेतकरी अडचणी आले आहेत. आधीच अतिवृष्टीने खरिपातील पिके वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पण पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी हार न मानता रब्बी व उन्हाळी पिकांची विक्रमी पेरणी केली आहे. राज्यात सर्वाधिक पेरणी झाल्याची नोंद राज्य कृषी आयुक्तांनी घेतली आहे.
शेतकरी नेते भाऊसाहेब गायके, नानासाहेब पळसकर, कुंडलिक अंभोरे यांनी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी गेले असता ते हजर नव्हते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्याशी चर्चा करून “आम्ही अहोरात्र शेतात राबराब राबून पिकवलेल्या शेतमालाचे काय करावे? तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही बाजारपेठेत येत नाही. नाही तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या. हे होत नसेल तर बंदचा निर्णय मागे घ्या असे ठणकावले.
तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी नाशवंत शेतमालाचा विचार करून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठी परवानगी दिली होती. जाधववाडीत विशेष उपाययोजना करून बाजारपेठ सुरू ठेवली होती. यामुळे शहरवासीयांना ताजा शेतमाल मिळाला होता. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळून मधल्या दलालीला चाप बसला होता. आता बंद पुकारताना विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच नियोजन केले नाही. सात दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने असंतोष पसरलेला आहे. शेतकरी, सभापतींनी बाजारपेठ सुरू ठेवण्यासाठी निवेदन सादर केले.
महत्वाच्या बातम्या
- मुनगंटीवार ‘सिनियर’ असूनही तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले; देशमुखांचा चिमटा
- विरोधकांच्या रोषानंतर सचिन वाझेंची बदली होणार; गृहमंत्र्यांनी केली घोषणा !
- आता तुम्ही महाराष्ट्राचे पप्पू होऊ नका; मुनगंटीवारांचा पटोलेंना मिश्किल टोला
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

