मुंबई : आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सला सलग सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईच्या झोळीत अजून एक पराभव दिला. मुंबई संघाच्या एकूण कामगिरीवर आणि सहाव्या पराभवानंतर मुंबईचा कॅप्टन रोहित शर्मा याने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पराभवाचे खापर वरच्या फळीतील फलंदाजांवर फोडले आहे.
सहाव्या पराभवानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”जेव्हा तुम्ही अशा धावसंख्येचा पाठलाग करत असता तेव्हा आम्हाला मोठ्या भागीदारीची आवश्यकता असते, जे आम्ही आज करू शकलो नाही. यामागे कोणतेही विशेष कारण नाही, आम्ही प्रयत्न करतो आणि संघ म्हणून काम करतो. ते खूप खोलवर फलंदाजी करतात आणि तुमच्या प्रमुख गोलंदाजांना त्यावेळी राखून ठेवणे महत्त्वाचे असते. आम्ही नेहमी बुमराहला अशा परिस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याने चांगली गोलंदाजी केली पण इतरांना मेहनत घ्यावी लागेल. आम्ही खेळतो तो प्रत्येक खेळ ही संधी असते, आम्ही प्रयत्न करतो आणि विचार करतो की आमची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन कोणती आहे जी विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट संघासाठी सर्वात योग्य आहे.”
”आम्ही आता सहा सामने गमावले आहेत, आम्ही आमचे योग्य संयोजन काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु हे सर्व विरुद्ध संघावर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही सामना गमावता, तेव्हा कोणते बदल केले गेले पाहिजेत, हे दाखवणे खूप सोपे आहे परंतु आम्ही आमच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनसह जाण्याचा प्रयत्न करतो. राहुलने शानदार फलंदाजी केली, अशा फलंदाजीची आमच्या संघात उणीव आहे, आमच्या अव्वल चारमधील कोणीतरी शक्य तितकी शेवटपर्यंत फलंदाजी करावी अशी आमची इच्छा आहे, जे घडत नाहीये. आम्ही अद्याप एकही सामना जिंकलेला नाही, परंतु आम्हाला आमचा आत्मविश्वास गमावायचा नाही. मी प्रत्येक सामन्यासाठी ज्या प्रकारे तयारी करतो त्याप्रमाणे मी स्वत:ला तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पण निकाल नीट लागत नाहीये. पण, ही संपूर्ण जबाबदारी मी स्वत:वर घेतो. मी माझ्या अनुभवाचा पुरेपूर वापर करेन आणि मला आशा आहे, की एक संघ म्हणून आम्ही लवकरच कमबॅक करू”, असे रोहित म्हणाला.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावलेल्या केएल राहुलच्या लखनऊने दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईला २० षटकात २०० धावांचे आव्हान दिले. मुंबईच्या गोलंदाजी विभागात पुन्हा गफलत पाहायला मिळाली, शिवाय क्षेत्ररक्षणही सुमार दर्जाचे राहिले. लखनऊच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची फलंदाजीही ढेपाळली. २० षटकात मुंबईला ९ बाद १८१ धावांपर्यंतच पोहोचता आले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

