उस्मानाबाद : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील प्रतीक्षा पुणेकर या अठरा वर्षीय युवतीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पण चुकीचे उपचार व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रतीक्षाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आज स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिच्या नातेवाईकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ध्वजवंदन कार्यक्रमानंतर अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न प्रतीक्षाच्या आई वडिलांनी केला. मात्र, त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनूसार, तुळजापूर शहरातील वेताळनगर भागात राहणारे प्रकाश पुणेकर व संजीवनी पुणेकर हे दाम्पत्य राहात आहे. त्यांना प्रतीक्षा नावाची एकुलती एक मुलगी होती. दरम्यान, हिला उलटी होऊन पोटात दुखत असल्याच्या कारणाने शहरातील कुतवळ हॉस्पिटलमध्ये ४ फेब्रुवारी २०२० रोजी दाखल करण्यात आले होते. चार दिवस कुतवळ हॉस्पिटलमध्ये मुलीला ठेवण्यात आले. त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२० ला पहाटे अचानक प्रतीक्षाला सोलापूरला नेण्यास डॉक्टरांनी सांगितले.
दुर्दैवाने त्याच दिवशी मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत डॉ. दिग्विजय कुतवळ यांच्याविरुद्ध तिच्या पालकांनी वारंवार तक्रारी दिल्या. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झाली नाही. यामुळे मुलीच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी युवतीच्या कुटुंबातील सर्वांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी
- ‘फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच ‘फाळणी भयस्मृती दिन’ साजरा करणार’
- तिरंगा फडकला! लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या भाषणाला सुरुवात


