मुंबई : देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कोरोनाचा सर्वाधिक फटका असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित या बैठकीत देशातील सर्वात जास्त कोविड संसर्ग फैलावलेल्या महाराष्ट्रासह इतर राज्यांचेही मुख्यमंत्री होते.
या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. या बैठकीत ‘महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. मात्र,अर्थचक्राला झळ बसू नये याची आम्ही काळजी घेतली. कोविडविरुद्धची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा ही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने राज्याला मिळावा अशी मागणी करून मुख्यमंत्री म्हणाले की ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने त्यांना संसर्ग थोपवता आलेला आहे. आपल्याकडे लस उत्पादक कंपन्यांची मर्यादित क्षमता पाहता त्यामुळेच इतर देशांतून उत्पादन होत असलेल्या लसी आम्ही आयात करून लसीकरण अधिक गतीने वाढवू शकतो का यावर मार्गदर्शन करावे. रेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही ते म्हणाले. रेमडेसिवीर, व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी योग्य तो अभ्यास व्हावा. कोविड सुसंगत कार्यप्रणाली आत्मसात करणे खूप गरजेचे. त्यामुळे कोविड सुसंगत वर्तनावर कायमस्वरूपी भर देणार असल्याचे देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- महाराष्ट्रासाठी दुर्दैवाने कडक निर्बंध लावण्याची वेळ मात्र,अर्थचक्राला झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री
- ज्यादा भाडे दर आकारणार्या रुग्णवाहिकांवर परभणी आरटीओ कारवाई करणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- बीड येथे वाळू माफियांवर कारवाई; ५० ब्रास वाळूसह दोन बोटी जप्त


