लातूर: जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जास्तच विदारक चित्र सध्या देशभरात तयार केले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय सुविधा आपुऱ्य पडत असल्याने रुग्णांचे वेळेवर उपचार होत नाहीये, तसेच ऑक्सीजनच्या तुटवड्यामुळे देखील अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता आता लसीकरण मोहीम जलद गतीने राबवणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यात लसीचा देखील तुटवडा जाणवत आहे.
निलंगा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येचा व कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर झपाट्याने वाढत असताना लसीकरण युध्द पातळीवर होणे गरजेचे आहे. मात्र लस उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणचे लसीकरण बंद झाल्याचे दिसून येत असून निलंगा शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढ तेजीत तर लसीकरण मात्र मंद गतीने बघायला मिळत आहे.
निलंगा शहर व तालुक्यात कोरोनाचे ११०० पेक्षा जास्त ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या असून आठ दिवसात ४० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीवर रामबाण उपाय ठरत असलेल्या लसीकरणाचा केंद्र सरकारच्या वतीने मोठा गाजावाजा करण्यात आला. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर व दुसऱ्या टप्प्यात ४५ वयोगटापुढील पुढील नागरिकांना लसीकरणाला सुरुवात झाली.
तालुक्यात जवळपास २० हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता कोठे लस घेण्यासाठी नागरीक घराबाहेर पडत असताना मागच्या आठ दिवसापासून लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. लस नसल्याने अनेक ठिकाणचे लसीकरण बंद करण्याची वेळ आली आहे. तर दररोज किंवा एक दिवसआड मोजक्याच लस उपलब्ध होत असल्याने उपलब्ध लसीनुसार तालुक्यातील आरोग्य उपकेंद्राला लस पुरवठा करण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम यांनी सांगितले. एका बाजूला कोरोना रुग्ण संख्या व मृत्यू दर वाढत असताना जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असताना लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी जबाबदार, राहुल गांधींचा आरोप
- लातूर जिल्ह्यात लसीकरण ठप्प ?
- एन. व्ही. रामण यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ
- ‘देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, मात्र आता ते उतावीळपणा करतायत’
- ‘या’ जिल्ह्याच्या सीमा सील, आता प्रवासासाठी लागेल ई-पास


