मुंबई : आज मानखुर्दमधील मंडल परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या जवळपास १९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या वर्षात आग लागण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. हे वर्ष सुरु होऊन एक महिना झाला असताना अनेक मोठमोठ्या आगी लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत.गेल्या महिनाभरात आगीच्या ज्या घटना घडल्या त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
भिवंडी
भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परीसरातील कपिल रेयॉन इंडिया प्रायवेट लिमिटेड या डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही.२८ जानेवारी रोजी रात्री दोन ते अडीचच्या सुमारासा या कंपनीत आग लागली. त्यावेळी या कंपनीत असलेले 30 ते 40 कामगार वेळेत बाहेर पडल्याने त्यांचा जीव बचावला मात्र या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.
हडपसरमधील रामटेकडी
हडपसरमधील रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील कचरा प्रकल्पास साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली होती.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली.
सीरम इन्स्टिट्युट
२१ जानेवारी रोजी करोना लसीकरणामुळं सध्या चर्चा सुरु असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली होती. या इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांपेकी काहींना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे, तर, पाच जणांचा यात मृत्यू झाला. जवळपास १००० कोटींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भंडारा
नऊ जानेवारीच्या मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात ‘शिशू केअर’ कक्षाला लागलेल्या आगीत दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला होता. या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला.भंडारा जिल्हा रुग्णालय अग्निकांडात दहा नवजात बालकांचा मृत्यू होणे ही काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत दुःखद घटना होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच या दुर्घटनेपासून धडा घेऊन राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करून दक्षता घ्यावी अशी मागणी यानंतर जोर धरला होता.
लातूर
सहा दिवसांपूर्वी लातूर शहरातील गंजगोलाई या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी रोडवर गोयल ट्रेडिंग कंपनी या रंगाच्या दुकानाला शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागली. काही वेळातच ही आग इमारतीतील चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घटनेत जीवितहानी झालेली नाही.
गोरेगाव
गोरेगाव पश्चिम भागात असलेल्या एका स्टुडिओला लागली भीषण आग लागून स्टुडिओतील सामान जळून खाक झाले आहे. बांगुल नगर येथील मोकळ्या जागेत हा स्टुडिओ उभारण्यात आलेला आहे. २ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमाराला ही भीषण आग लागली. या आगीमध्ये जीवितहानी झाली की नाही, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या आगीमध्ये स्टुडिओतील सर्व सामान जळून खाक झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
काँग्रेस रक्ताने शेती करतंय, भाजप नव्हे; राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा हल्लाबोल
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

