हिंगोली: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरू आहेत आणि याची माहिती पोलिसांना देखील होती मात्र कुठलीच कारवाई पोलिसांकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा कसलाच धाक नसल्याने सर्रासपणे अवैध धंदे सुरू होते, मात्र वरिष्ठ कार्यालयातून फोन वाजताच सहायक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे यांनी बंद पेट्रोल पंपाजवळ सुरु असलेल्या जुगार, मटका आणि तितली भवऱ्यावर शुक्रवारी कारवाई केली. यावेळी सेनगाव पोलिसांनी तीन आरोपीना अटक करुन त्यांच्याकडील ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
सेनगाव शहरासह तालुकाभरात अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहेत. अनेक खेडे गावामध्ये किराणा दुकानावरुन अवैध दारू विक्री होत असल्याचे पहायला मिळते. जुगार, मटका आणि तितली भवरा सुध्दा खुलेआम सुरु आहे. कोरोनाच्या काळात सुध्दा अवैध धंद्यावर अंकुश बसला नव्हता. उलट बेकायदेशिर दारु विक्रेत्यांमध्ये वाढ झालेली पहायला मिळाली. तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी यांच्यावर कुठलीही ठोस कारवाई केल्याचे दिसून आले नव्हते. परंतु त्यांच्या बदलीनंतर सेनगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे यांच्याकडे कारभार सोपावण्यात आला.
पोलिस प्रशासनाला न जुमानता खुलेआम मटका, जुगार आणि तितली भवरा असे जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ हिंगोली कार्यालयात देण्यात आली. वरिष्ठांच्या सुचनेवरुन लोकडे शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अभयकुमार माकने, पोलिस अमंलदार शिंदे व मेनकूदळे यांना सोबत घेऊन सेनगाव येथील बंद अवस्थेत असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूला रिकाम्या जागेत सुरु असलेल्या जुगार अड्यावर कारवाई केली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. परंतु काहीजण पोलिस दिसताच पसार झाले.
ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये गजानन बिडकर रा. सेनगाव याच्याकडे एक लॅपटॉपसह ३२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शिवाजी गीते रा. नागासिनगी याच्याकडे ९४० रुपये मिळाले तर विष्णु खरात रा. कोळसा याच्याकडे दोन हजार ७२० रुपये मिळाले आहेत. यासह दोन निळ्या रंगाच्या पेन, ज्यावर मटक्याचे आकडे लिहिलेले होते ते दोन रजिस्टर, तितली भवऱ्याचे चार्ट, पेपर कार्बन व आकड्याच्या चिठ्ठया पोलिसांना मिळाल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक दिक्षा लोकडे यांच्या फिर्यादीवरुन सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादा… हे वागणं बरे नव्हे… आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज होणे हे संतापजनक आहे
- बीडमध्ये सध्या आंदोलनाचे वारे; आता २१ जूनला ‘रास्ता रोको’
- ‘१२ वी नापास पण टीका करण्यात अव्वल’ ; केआरकेने पुन्हा एकदा साधला कंगनावर निशाणा
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
