बीड- बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल २ तास ३० मिनिटे बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर त्यांचा ताफा बाहेर निघाला असता कोविड च्या काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मच्याऱ्यांना निवेदन घेऊन भेटू दिले नाही म्हणून या शेकडो कर्मचाऱ्यांनी अजित पवारांचा व राजेश टोपे याच्या गाडीचा ताफा अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. यावेळी पोलिसांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला आहे.
आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांची सेवा करत आहोत, मात्र शासनाकडून मनाला वाटेल तेव्हा आम्हाला काढलं जातं आणि पुन्हा कोरोना जास्त पसरला की आम्हाला घेतलं जात आहे. यामुळे आम्ही ज्या पदावर काम करतोय, त्या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती द्या. ही मागणी घेऊन बीडमध्ये शेकडो महिला आणि पुरुष कर्मचारी आक्रमक झाले आहेत. तर या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांवर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला आहे, असा आरोप नर्सेसनी केला.
दरम्यान,या घटनेमुळे आता राज्य सरकारवर टीका होऊ लागली आहे. लाठीमाराच्या प्रकारावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीव्र शब्दात नाराज व्यक्त केलीय. ‘हा सगळा प्रकार संतापजनक आहे. ज्यांची जबाबदारी होती ते कमी पडले. स्वत:च्या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले आहेत तर जमा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची अजित पवारांची भेट घडवून आणणं तिथल्या स्थानिक नेत्यांचं काम होतं. त्यांनी ठरवलं असतं तर गोंधळ झाला नसता. मागण्या तर पूर्ण होत नाहीत, पण किमान भेट आणि बोलू द्यायला हवं होतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्यांना अशाप्रकारे धक्काबुक्की आणि लाठीमार हे संतापजनक आहे. अजित पवारांकडून हे अपेक्षित नव्हतं’, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.
दरम्यान, बीडमध्ये आरोग्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी कंत्राटी कर्मचारी आले होते. त्यांनी निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वेळ न देता त्यांच्यावर, इथं लाठीचार्ज करण्यात आला. या अमानुषपणे केलेल्या लाठीचार्जची चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर हा लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला, याची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.
दरम्यान, आपल्या मागण्यांची दखल घ्यावी म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुलंद केलेला आवाज दडपण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे.कोरोना काळात जीवाचे रान करून जनतेची सेवा करणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांना मायबाप सरकारकडून अशा पद्धतीने वागणूक दिली जाणार असेल तर या लोकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “स्वबळाची भाषा राष्ट्रवादी करत नाही”, टोंपेंचे ‘स्वबळावर’ स्पष्टीकरण
- पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…
- मिल्खा सिंग यांचा वारसा सदैव सोबत राहील; अनिल कुंबळेंच्या भावना
- पहिल्या दिवशी वरुणदेवाने बॅटिंग केल्यामुळे खेळ वाया; दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

