मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.
तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो वा पुढील विधानसभा निवडणूका, काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, ‘अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं सांगतानाच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील,’ असा इशारा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वर्धापन दिनी दिला होता.
यानंतर, काँग्रेसने देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, ‘एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणे हे काही चुकीचे नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे’ असा सल्लावजा टोला सेनेनं काँग्रेसला लगावला. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाचा दाखला देत काँग्रेसला सल्ला दिला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामना अग्रलेखासह संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून पलटवार केला आहे. ‘कोरोना काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन काम केलंय. रक्तदान, ऑक्सिजन पुरवठा, मास्क वाटप, प्लाझ्मा दान अशी अनेक कामं काँग्रेसनं केली आहेत. स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही.’ असं चोख प्रत्युत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘परिवर्तनाची वेळ आलीये ? उद्धवजींच्या मनातलं फक्त रश्मीवहिनींनाच माहित असेल’
- राजकीय भूकंपाची नांदी ? दिल्लीत शरद पवारांचे प्रशांत किशोरांसोबत खलबतं
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘समांतर २’ चा ट्रेलर प्रदर्शित, ‘या’ अभिनेत्रीची झाली एन्ट्री
- ‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी


