जळगाव : येत्या आषाढी एकादशीला (दि.२० जुलै) मानाच्या दहा पालख्यांनाच पंढरपुरात येऊ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. शिवाय या मानाच्या दहा पालख्यांमधील सहभागी होणाऱ्या भाविकांना पायी नव्हे तर बसने त्याठिकाणी यावे लागणार आहे.परंतु या निर्णयाला आता अनेकांनी विरोध दर्शवला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेले आहे.
तर आता मुक्ताबाई पालखी सोहळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी आसुसलेला असतो, आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे ही वारकऱ्यांची इच्छा असते. परंतु, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले आहेत. या प्रस्तावाचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते’, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली.
माझी वारी-माझी जबाबदारी
सरकारने आम्हाला तुरुंगात डांबले तरी चालेल. परंतु अमरावती जिल्ह्याची ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करीतच पंढरपूरला पोहोचेल, अशी माहिती अमरावती विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेट्ये यांनी दिली. सरकारने मध्यंतरी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’हे ब्रीद स्वीकारून नागरिकांना कोरोनाची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. २४ जूनपर्यंत सरकारचा निर्णय न बदलल्यास आम्ही ‘माझी वारी-माझी जबाबदारी’ यानुसार आमचा मार्ग निवडू असा इशारा त्यांनी दिला.
निर्णयासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार करावा
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील,’ असा इशारा त्यांनी दिला आहे. तर आता आषाढी वारीच्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी देहू संस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण


