मुंबई : आयर्लंड विरुध्द भारत टी-२० मालिकेनंतर आयसीसीने नवीनतम क्रमवारी अपडेट केली आहे. सांघिक क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. तर फलंदाजीत भारताच्या दीपक हुडा आणि संजू सॅमसनने जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र, इशान किशनला टॉप १० मध्ये फटका बसला आहे. दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांत शतकासह १५१ धावा केल्या होत्या. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत हुडाने ४१४ स्थानांचा जबरदस्त फायदा झाला आहे. या यादीत दीपक हुडा थेट १०४ व्या स्थानावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसन ५७ स्थानांनी झेप घेत १४४ व्या स्थानावर आला आहे. या यादीत टॉप १० मध्ये इशान किशन एका स्थानाच्या नुकसानासह सातव्या स्थानावर घसरला आहे. आयर्लंडचा हॅरी टेक्टर ५५ स्थानांनी झेप घेत ६६ व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजीत भारताचा हर्षल पटेल चार स्थानांच्या फायद्यामुळे ३३व्या स्थानावर आला आहे. तर आयर्लंडचा मार्क अडायर दोन स्थानांच्या बढतीमुळे ४३ व्या स्थानावर आहे. नेदरलँड विरुध्द इंग्लंड आणि श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यानंतर एकदिवसीय क्रमवारीतही सुधारणा करण्यात आली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स कॅरी तीन स्थानांच्या बढतीमुळे २३व्या स्थानावर तर इंग्लंडचा जोस बटलर चार स्थानांची झेप घेत २५ व्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड गोलंदाजीत दोन स्थानांनी प्रगती करत संयुक्त पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंडचा डेव्हिड विली तीन स्थानांच्या बाढतीमुळे ३३ व्या स्थानावर आला आहे.
इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड तिसरी कसोटी आणि वेस्ट इंडिज विरुध्द बांगलादेशची दुसरी कसोटी झाल्यानंतर कसोटी क्रमवारीतही बरेच बदल झाले आहेत. फलंदाजीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने चार स्थानांनी प्रगती करत १२व्या स्थानावर तर टॉम ब्लंडेलने ११ स्थानांनी प्रगती करत २०व्या स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंडसाठी जॉनी बेअरस्टो २० स्थानांनी झेप घेत २१ व्या स्थानावर तर ओली पोप तीन स्थानांनी ४९ व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा क्रेग ब्रॅथवेट एका स्थानाने २७व्या, काइल मेयर्स २२ स्थानांनी ५७व्या आणि जॉन कॅम्पबेल चार स्थानांनी ७६व्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशचा नुरुल हसन १४ स्थानांनी ८४ व्या तर नजमुल हुसेन शांतो ११ स्थानांनी प्रगती करत ८८ व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड एका स्थानाने १३व्या तर जॅक लीच १३ स्थानांनी प्रगती करत २५व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ आणि जेडेन सील्स संयुक्त ४० व्या स्थानावर पोहोचले आहेत. बांगलादेशचा खालिद अहमद ८८व्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत शाकिब अल हसन एका स्थानाच्या घसरणीसह तिसऱ्या स्थानावर आला आहे.
महत्वाच्या बातम्या:


