नागपूर : राज्य सरकारने ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. ती निव्वळ धुळफेक असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणारा पैसा राज्य सरकार केवळ आधी देणार, त्याला अतिरीक्त आर्थिक मदत म्हणता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याच बरोबर केशकर्तनालय यांच्यासह इतर बारा बलुतेदारांना आर्थिक मदत देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारच्या वतीने आर्थिक मदतीची देखील घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा केवळ धुळफेक असल्याची टीका फडणवीस यांनी केली. ज्या ३३०० कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांसाठी केली आहे, ती अर्थसंकल्पातील वर्षभरासाठीची तरतूद आहे. त्या ऐवजी संकटाच्या काळात किती हॉस्पिटल, बेड्स किंवा व्हेंटिलेटर वाढवणार आहात, त्यासाठीची वेळ मर्यादा निश्चित करण्याची आवश्यकता होती. असेही ते म्हणाले.
धान्य पुरवठ्याचा प्रश्नच नाही. केंद्र सरकार आधीच धान्य पुरवठा करते आहे. त्यांच्याकडे तो मागितला तर धान्य अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले. एक कोटी नागरिक या योजनेपासून वंचित आहेत, त्यांना ही मदत देण्याची योजना तयार करायला हवी होती, असेही ते म्हणाले.
आदिवासी बांधवांचे आधीच थांबवून ठेवलेले ४००० रुपयांचे अनुदान पाहता आता घोषणा केलेले २००० रुपये अत्यंत तुटपूंजे असल्याचेही ते म्हणाले. एकूणच सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या उपाय-योजनांवर फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून राज्य सरकार केवळ दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या :
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार


