परभणी : संगीतकार अजय-अतुल विरोधात परभणी येथे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘माझी मैना गावावर.’ या गीताचे विडंबन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्या गाण्यातील ओळीत बदल करून वाईट हेतूने छेडछाड आणि बदल अजय अतुल यांनी केला. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्मांचा, मराठी भाषकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केल्याबद्दल शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
गणपत भिसे असे तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारीत म्हटले आहे की, संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढणाऱ्या आंदोलकांच्या कार्यकक्षा अधोरेखित करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ ही छक्कड लिहिलेली आहे. म्हणजे निपाणी, बेळगाव, कारवार हा भूभाग मराठी भाषकांचा असून महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. त्या शिवाय संयुक्त महाराष्ट्राचे आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार नाही, म्हणून आताचा जो महाराष्ट्र आहे, तो संयुक्त नाही. कारण काही मराठी भाषा प्रदेश कर्नाटकात अडकून पडलेला आहे. त्यासाठी या छक्कडमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ‘बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ असे लिहिले आहे.
पण मूळ रचनेत बदल करून संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी संदीप लिरिक्स वर्ल्ड या यु-ट्यूब चॅनलवर ‘वेणी माळायची अजून राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली’ असे गाऊन छक्कड प्रकारात मोडणाऱ्या गीताचा संपूर्ण अर्थ बदलून टाकला आहे. ‘बिनी मारायची अजून राहिली’ म्हणजे घाव घालायचा अजून बाकी आहे, अशा आशयाच्या गीताला ‘वेणी माळायची अजून राहिली.’ असा बदल केला आहे.
वेणी माळण्याचा अर्थ म्हणजे सुहागरात किंवा शारीरिक संबध या अर्थाने निघत असल्याने गीताचा संपूर्ण अर्थ आणि आशय बदलला आहे. अशाप्रकारे गीतामध्ये वाईट हेतूने ही छेडछाड आणि बदल केला आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा, मराठी भाषकांचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान झाला आहे. यामुळे आमच्या व समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी संदीप लिरिक्स वर्ल्ड हे यु-ट्यूब चॅनल चालवणारा व्यक्ती, संगीतकार, गायक अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी या तक्रारीची गांभिर्याने दखल घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- रमजान महिन्यासंदर्भात राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
- दररोज २५ हजार जणांना लस द्या, जालना; पालकमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश
- मराठवाड्याला अवकाळीचा फटका; नांदेडमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू, दोन म्हशी दगावल्या
- अर्धशतक हुकले तरीही हिटमॅनने रचला एक विक्रम
- दिलासा! यंदा देशात सरासरी १०३ टक्के पावसाचा अंदाज


