🕒 1 min read
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रूग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणामध्ये अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहाण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यंत्रणांना निर्देशित केले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या काळात हा संसर्ग अधिक वाढणार असल्याचा धोका लक्षात घेऊन गर्दी रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने अधिक खबरदारीने, तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वाढ करण्याचे निर्देशित केले.
कोणत्याही परिस्थितीत रूग्णांना चांगले उपचार हे मिळालेच पाहीजे, त्यासाठी आवश्यक ते करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला जागीच रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचणी केंद्र 500 पर्यंत वाढवून 10 हजारांपर्यंत चाचण्या वाढवावी. शहरी, ग्रामीण सर्व ठिकाणी पुरेश्या खाटा, अत्यावश्यक उपचार सुविधा, सज्ज ठेवा. तसेच ज्या – ज्या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, तेथे अधिक सतर्कतेने बंधने वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणावी. औषधांची उपलब्धता पुरेशा प्रमाणात ठेवावी. तसेच वाजवी दरात नियमानुसार त्यांची विक्री होण्यावरही कटाक्षाने नियंत्रण ठेवावे. जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन उपलब्धता आहे, ही समाधानाची बाब आहे. वाढीव व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ते प्राप्त होतील, असे देसाई यांनी यावेळी सांगितले.
तसेच कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम यशस्वी होणे गरजेची आहे. 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची राज्य शासनाची मागणी केंद्राने मान्य केली आहे. त्या दृष्टीनेही वाढीव लसीकरण केंद्राची सुविधा सज्ज ठेवत जिल्ह्यात लसीकरणाचे उद्दीष्ट पुर्ण करण्याचे सूचित करून देसाई म्हणाले, की कोणत्याही परिस्थितीत नागरिकांचा रोजगार आणि उत्पन्न बंद होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. मात्र त्यासोबतच कोरोनाला रोखणे ही प्राथमिकता देखील आहे. याचा समतोल साधत वाढता संसर्ग रोखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते यशस्वीरित्या पेलण्यात यंत्रणांची सक्रियता महत्वाची आहे. कोरानाच्या पहिल्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन दुसरी लाट थोपवण्याच्या जबाबदारीतून सर्वांनी आपली कार्यक्षमता वाढवण्याचे सांगितले. सरकार आवश्यक निधीसह सर्व प्रकारचे सहाय्य औरंगाबाद जिल्ह्याला उपलब्ध करून देईल, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- रणबीर-आलियाच्या संगीतमध्ये ‘या’ गाण्यावर डान्स करणार आई नीतू कपूर ; व्हिडिओ व्हायरल
- …आणि ‘या’ माकडांना वाटतं की, ते बंगालमध्ये जिंकतील ?
- अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डच्या वडिलांचे निधन
- ‘मी पुन्हा येऊ का?’ ‘या’ कॉमेडीयने साधला फडणवीसांवर निशाणा
- ‘त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा’,भाजपा नेत्याची ममतांवर वादग्रस्त टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
