औरंगाबाद : कोरोना योध्दा म्हणून शिक्षकांना लसीकरण, सर्वेक्षण, चेक पोस्ट, रेशन वाटप अशी कामे देणार्या राज्य शासनाने त्यांना विमा कवचचे संरक्षण मात्र नाकारले आहे. याबाबत तीव्र संताप व्यक्त करून शिक्षकांना विमा कवच संरक्षण देण्याचा सुधारित आदेश काढावा, अन्यथा संबंधित सर्व कामांवर बहिष्कार घालण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेने दिला आहे.
ग्रामविकास विभागाने राज्यातील सांगली, सातारा, पुणे, भंडारा, नागपूर, कोल्हापूर आणि गोंदिया या जिल्ह्यातील शिक्षक वगळून इतर कर्मचारी विमा कवचास पात्र ठरविले आहे. यात सर्वाधिक प्रकोप असलेल्या मराठवाडा, कोकण व उर्वरित सर्व महाराष्ट्राला वगळून दूजाभाव केला आहे. सर्व शिक्षक आजही लसीकरण, कोरोना सर्वेक्षणात व्यस्त आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हातान्हात कर्तव्य पार पाडत असताना अनेकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असून काहीना आपले प्राणही गमवावे लागले आहे.
या शिक्षकांना विमा कवचमधून वगळल्यामुळे शिक्षक भारती संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. आदेशात बदल न केल्यास कोरोनाच्या कामावर बहिष्कार घालू असे संघटनेने म्हंटले आहे. शिक्षक नेते आ. कपिल पाटील यांच्याशी चर्चा करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला जाईल असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे, सुनील चिपाटे, किशोर कदम, मच्छिंद्र भराडे, महेंद्र बारवाल यांनी केली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत असणारे शिक्षक कोरोना काळात मागील दीड वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कक्षेत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावताना अनेक शिक्षकांचे मागील दीड वर्षात निधनही झाले आहे. मात्र राज्य सरकारने शिक्षकांना विमाकवच योजनेचा ५० लाख रुपयांचा लाभ दिलेला नाही. शिक्षकांना विमाकवच देऊन त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकार्यांना द्यावेत, अशी मागणी आदर्श शिक्षक समितीच्या वतीने मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात ११ आरोग्य अधिकाऱ्यांचे पदे रिक्त, आरोग्य यंत्रणेवर पडतोय ताण
- आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी
- लोकसहभागातून चाकूर येथे शिवरस्ता तयार
- लॉकडाऊनचा परिणाम! एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट
- आता घरातही मास्क घालण्याची वेळ आली, केंद्र सरकारची सूचना


