🕒 1 min read
मुंबई : राज्य पोलिस दलातील पोलिसांना स्वतःचे घर मिळावे यासाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी भूमिका मांडली असून त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांना आपल्या गावी स्वतःचे घर बांधायचे असेल तर त्याला २५ लाखांचे कर्ज देऊन त्यावर माफक दरात व्याज आकारले तर पोलिसांना आपल्या मूळ गावी घर बांधता येईल. त्या पोलिसाचा कार्यकाळ संपेपर्यंत निदान त्याच्या मूळ गावात तरी त्याचे हक्काचे घर होऊ शकते. या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. विरोधकांच्या वतीने विधानसभेत उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान ते बोलत होते.
यावेळी रोहित पवार यांनी कायदा व सुव्यवस्था, अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई अशा अनेक विषयांना हात घालत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “आपण भारतीय संस्कृती आत्मसात करुन जगणारे लोक आहोत. समता, न्याय, बंधुता, त्याग ही आपली मूल्ये आहेत. वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा हे आपली संस्कृती आपल्याला शिकवते. काही दिवसांपूर्वी भंडारा-गोंदियाची सामूहिक बलात्काराची घटना कानावर आली आणि मन सुन्न झाले. विधिमंडळात बोलत असताना सत्ताधारी किंवा विरोधी बाकांवरील लोकांनी अशा घटनांच्या विरोधातच भूमिका घेऊन बोलले पाहीजे. चित्रा वाघ यांचे कौतुक केले पाहीजे. सरकारमधील कुणीही या घटनेच्या विरोधात बोलत नव्हते. चित्रा वाघ त्याठिकाणी गेल्या आणि अनेक बाबी समोर आल्या. या सभागृहाने शक्ती विधेयक मंजूर करुन राष्ट्रपतींकडे पाठवले, मात्र काही कारणांमुळे ते प्रलंबित आहे. माझे सर्वपक्षीय सदस्यांना आवाहन आहे की, त्यांनी हा कायदा मंजूर होण्यासाठी प्रयत्न करावेत.”
राज्यात ठिकठिकाणी अवैध डान्सबार सुरु-
आज पोलीस प्रशासनात अधिकारी, कर्मचारी वर्ग कमी आहे. मात्र काही ठराविक आमदारांच्या संरक्षणासाठी दहा-दहा पोलिस तैनात केले आहेत. म्हणजे ५० आमदारांच्या संरक्षणासाठी ५०० पोलीस आहेत. आम्ही याचा विरोध करत नाही, मात्र याबाबत परत विचार झाला पाहीजे. टिव्हीवर आम्ही डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशनची एक बातमी पाहिली. स्व. आर. आर. आबा यांनी याच सभागृहात डान्सबारवर बंदी घातली होती. अनेक लोक आपली जमीन विकून आलेला पैसा डान्सबारमध्ये उडवतात. त्यामुळे त्यांच्यासहीत त्यांचे कुटुंबीय अडचणीत येतात. राज्यात ठिकठिकाणी अवैध डान्सबार सुरु आहेत. ते कसे बंद होतील, याबाबत लक्ष घालण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात चार आणि गुजरातमध्ये आठ स्थानके येत आहेत-
दुसरा विषय म्हणजे बुलेट ट्रेन. ५०८ किमी लांबीचा हा प्रकल्प असून महाराष्ट्रात याची लांबी केवळ १५५ किमी आहे. बुलेट ट्रेनसाठी १ लाख २० हजार कोटींचा खर्च येणार आहे. महाराष्ट्रात चार आणि गुजरातमध्ये आठ स्थानके येत आहेत. तरीही आपल्याला या प्रकल्पात समान खर्च उचलावा लागत आहे. यापेक्षा १०० कोटी खर्च लागणारी आणि ताशी २०० किमी धावणारी ‘वंदे भारत’ ही योजना फायदेशीर ठरु शकते. एवढा पैसा खर्च करायचाच असेल तर आपण शिक्षण, पाणी पुरवठा योजना, वसतिगृह यासाठी खर्च करता येऊ शकतो. केवळ कुणाच्या तरी नावासाठी एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा राज्यात विकास करण्यासाठी वापरला पाहीजे.
कोरोना काळात अनेकांचे उत्पन्न घटले-
तसेच आयएफसी सेंटर, शिप बिल्डिंग प्रकल्प हे गुजरातला गेले आहेत. हे प्रकल्प राज्यात झाले असते तर अनेक तरुणांना रोजगार मिळाला असता. कोरोना काळात अनेकांचे उत्पन्न घटले. त्यातच आपल्याला केंद्र सरकारकडून मिळणारा जीएसटीचा मोबदला यापुढे मिळणार नाही. त्यामुळे आहे तो पैसा आपल्याला विचारपूर्वक खर्च करावा लागणार आहे. आरे कॉलनीचाही विषय चर्चेत आहे. आरे भाग मुंबईचे फुफ्फुस समजले जाते. कोरोना काळात निरोगी फुफ्फुसाचे महत्त्व आपल्याला कळले. त्यामुळे मुंबईचे फुफ्फुस निरोगी कसे राहील, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकार आले, तेव्हा आरे कारशेडचे काम इतर ठिकाणी वळविण्याचा प्रयत्न केला. ती जागा देखील सरकारचीच होती, मग त्याठिकाणी कारशेड उभारण्यास काय हरकत होती? मुंबईच्या भवितव्यासाठी गट-तट विसरुन याबाबत विचार झाला पाहीजे.
केंद्र आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात वाढीव दराने पेट्रोल-डिझेलची विक्री-
महागाईबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, आघाडी सरकार असताना पेट्रोल-डिझेलवर एक रुपयाचा सेस होता. मात्र फडणवीस सरकार आल्यानंतर त्यावर १ रुपयावरुन ११ रुपये सेस वाढविण्यात आला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अतिशय कमी असताना केंद्र आणि राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात वाढीव दराने पेट्रोल-डिझेलची विक्री होत होती. मार्च २०२२ च्या अर्थसंकल्पात सीएनजीवरील कर दहा टक्क्यांनी कमी केला. मात्र केंद्राने त्यात आणखी वाढ केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “लवासाचे खोके बारामती ओके”, रोहित पवार दिसताच सत्ताधारकांनी लावला नारा
- Uddhav Thackeray | ‘खड्ड्यांचे खोके, मोतोश्री ओके’, सत्ताधारी नेत्यांचा शिवसेना पक्षावर हल्ला
- Nitin Gadkari | “राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा हटवून कॅमेरे बसवले जाणार”, नितीन गडकरी यांची नवीन योजना
- Aditya Thackeray | युवराजांची दिशा चुकली, सत्ताधाऱ्यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
- Ajit Pawar | पूर्वी तुम्ही डान्स बार फोडलेत, आता तुमच्या घराजवळच सुरू- अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
