🕒 1 min read
मुंबई : राजकारणात कोणत्याही पक्षाचे सरकार कधीही कोसळले जाऊ शकते. याचे अनेक उदाहरणं महाराष्ट्रसह देशातील जनतेने पाहिलेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारल्यानंतर भाजप सोबत जात राज्यात सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनेला सुरू झालेली गळती अजूनही सुरूच आहे. अनेक ठिकाणचे शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याच्या मार्गावर आहेत. ह्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले तर शिवसेना फुटणार हे पवारांना आधीच माहिती होते, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
शिवसेना व एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्षाबाबत बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना शिवसेना जाणीवपूर्वक संपवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला. असे महाजन म्हणाले. शिवसेना-भाजप सोबतच राहिली असती तरीही परिस्थिती त्यांच्यावर आली नसती, तर ते आणखी मान-सन्मानाने राहिले असते. पुढच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप सोबत लढले असते आणि शिवसेना ६० ते ७० जागा जिंकली असती. शिवसेनेने महाविकास आघाडी सोबत जाऊन आत्महत्या केली आहे. असेही महाजन यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर पक्षाच्या तब्बल ४० आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. यानंतर आता शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सामील होताना पाहायला मिळत आहेत. शिंदेंनी बंद केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजप सोबत जात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर आता राज्यात स्थिर असे शिंदे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत कामाला लागले आहेत. या तीनही नेत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. तर काही ठिकाणी पक्षाचे मेळावेही आयोजित करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
