पालघर- तौक्ते चक्रीवादळाने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत अशा संकटात राज्य शासनाकडून विशेष मदत मिळत नाही. मात्र केंद्र सरकारच्या योजना आमच्यापर्यंत पोहचत नाही, त्यामुळे आम्हाला केंद्राच्या सागरमाला योजनेतून मदत मिळवून द्या, असे साकडे मच्छीमारांनी आमदार आशिष शेलार यांना घातले. पालघर दौऱ्यात आज भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार आणि आमदार मनिषा चौधरी यांनी पालघर मधील माहिम टेंभी या गावाला भेटी देऊन नुकसान झालेल्या बोटींची पाहणी केली.
यावेळी टेंभी मत्सव्यावसायिक सहकारी संस्था यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या मांडल्या. या गावातील तीन बोटींचे नुकसान झाले असून अनेकांची जाळी व अन्य साहित्याची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती मच्छीमार बांधवांनी केली. बोटीच बुडाल्याने बोटीचे मालक, त्यावर काम करणारे खलाशी यांच्या उदरनिर्वाहाची साधनेच उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे तातडीने मदत मिळावी अशी विनंती केली.
यावेळी मच्छीमारांनी सांगितले की, आज पर्यंत जेव्हा जेव्हा असे नैसर्गिक आपत्तीने नुकसान होते तेव्हा मच्छीमारांना शासनाकडून मदत मिळत नाही. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांमध्ये राज्यातील मच्छीमारांना बसवून मदत मिळवून देण्यास राज्य शासन पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे आम्हाला केंद्रीय योजनेतून मदत करा अशी विनंती स्थानिक मच्छीमारांच्या प्रतिनिधींनी केली.
दरम्यान, आमदार आशिष शेलार यांनी सांगितले की, आम्ही दोन दिवस पालघर, वसई आणि मुंबईच्या किनारपट्टीवरील नुकसानीची पाहणी करून सविस्तर निवेदन राज्य सरकारला देणार आहोत. त्यामध्ये मच्छीमार बांधवांचे म्हणणे आम्ही सरकार पर्यंत पोहोचवू. त्याचा पाठपुरावा करु. मच्छीमार बांधवांनी खचून जाऊ नये अशी विनंती ही त्यांनी यावेळी केली.
या दौऱ्यात आमदार आशिष शेलार यांनी वसईतील अर्नाळा गावात घरांचे आणि केळी व फुलबागांचे नुकसान झाले त्यांची भेट घेतली. तसेच अर्नाळा बंदरातील 4 बोटी बुडाल्या असून त्या मच्छीमारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १७९ जणांवर गुन्हे दाखल
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

